Ahmednagar District Hospital
Ahmednagar District Hospital Datta Ingale
पश्चिम महाराष्ट्र

डॉ. सुनील पोखरणांबाबतचा तो निर्णय राज्य शासनाचा : राजभवनाने केले स्पष्ट

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भाऊबिजेच्या दिवशी ( 6 नोव्हेंबर 2021 ) कोविड रुग्ण असलेल्या अतिदक्षता विभागाला आग लागली. या घटनेत 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणांचे निलंबन करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले होते. हे निलंबन काल रद्द झाले. हे निलंबन राज्यपालांनी विशेषाधिकार वापरत रद्द केल्याच्या बातम्या समोर येत होत्या यावर राजभवनाकडून आज सांगण्यात आले की, डॉ. पोखरणा यांच्या संदर्भातील निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे आता डॉ. पोखरणा यांच्या निलंबन रद्द बाबत जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे. ( State Government's decision regarding Dr. Sunil Pokhrana: Raj Bhavan made it clear )

राजभवनाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांचे निलंबन रद्द होणे अथवा निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांची नव्याने पदस्थापना होणे अशा निर्णयाबाबतची संपूर्ण कार्यवाही शासन स्तरावरच करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात कुठल्याही विशेषाधिकारांचा वापर केला नाही.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे राज्य शासनाकडून निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर डॉ सुनील पोखरणा यांनी 25 जानेवारी 2022 रोजी या निलंबनाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील तरतुदींना अनुसरून राज्यपालांकडे दाद मागितली होती.

या संदर्भात राज्यपालांनी 16 मार्च 2022 रोजी राजभवन येथे सुनावणी ठेवली होती तसेच या सुनावणीसाठी डॉ. सुनील पोखरणा तसेच प्रतिवादी म्हणून शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांना उपस्थित राहण्याबाबत कळविले होते.

सुनावणीच्या वेळी राज्य शासनाने डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन 15 मार्च 2022 रोजीच रद्द केले असून त्यांची पदस्थापना वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, शिरूर, जिल्हा पुणे या पदावर केली असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव नीलिमा केरकट्टा यांनी राज्यपालांना सांगितले. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आदेशावरून डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द झाले अथवा त्यांची पदस्थापना झाली, असल्याचे राजभवनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT