Jayant Patil
Jayant Patil Sarkaranama
पश्चिम महाराष्ट्र

कायम दुसऱ्याला पाठिंबा देण्याची सवय आता बंद करा : जयंत पाटलांनी सांगोला राष्ट्रवादीस सुनावले

दत्तात्रेय खंडागळे

सांगोला (जि. सोलापूर) : आपल्या (सांगोला) तालुक्यात कायमच इतरांना पाठिंबा देवाची सवय लागली आहे. आता पाठिंबा द्यायची सवय बंद करा. तालुक्याला जे जे हवी आहेत, अत्यावश्यक आहेत ती सर्व कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. परंतु तालुक्यातील राष्ट्रवादी (NCP) पक्ष संघटना सक्षम, मजबूत करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. (Stop the habit of always supporting others : Jayant Patil)

सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ‘परिवार संवाद यात्रा’ सोमवार (ता. २१ फेब्रुवारी) रामकृष्ण व्हीला सभागृहात झाली. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी रुपाली चाकणकर, युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख, युवतीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, पक्षनिरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे, महिला प्रदेश उपाध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, नागेश फाटे, रमेश बारसकर, अरुण आसबे, गणेश पाटील, दीपाली पांढरे, सुप्रिया गुंड, श्रेया भोसले, बाबूराव गायकवाड, तानाजी पाटील इत्यादी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, तालुक्यातील टेंभू-म्हैसाळ योजनेचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करण्यात येईल. दीपक साळुंखे यांनी सांगोला तालुक्यातील कामांबाबत जी निवेदन दिले आहेत, त्याबाबत कृष्णा खोरे महामंडळाचे अधिवेशन काळात बैठक लावून सर्व कामे पूर्ण करण्यासाठी व योजनेचे प्रत्येक गावाला पाणी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. परंतु तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कोणाला तरी पाठिंबा देण्याची सवय बंद करून संघटनेचा प्रभाव कसा वाढेल, याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. सध्या डाळींब व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठी आव्हाने असून त्यावर तोडगा काढण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील.

महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाले की, तुम्ही जी घोंगडी व काटी देऊन सत्कार केला आहे, तीच काठी विरोधकांवर चालवू. प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनसामान्य, शेतकरी, विद्यार्थी, युवक, शेतमजूर यांना मदत कराव्यात. महाविकास आघाडीची कामे तळागाळापर्यंत पोहचवावेत. आता कामाचे स्वरूप बदलले असून प्रदेशाध्यक्ष मुख्याध्यापक बनून पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कामांची, जबाबदारीची परीक्षा घेत आहेत.

‘व्हॉट्सॲप’वाले कधी बदलतात, हे सांगता येत नाही

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तालुक्यातील बैठकीसाठी पक्षातील उपस्थित-अनुपस्थित पदाधिकाऱ्यांचा आढावा घेत होते. त्यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे यांना मध्येच बोलण्याचे थांबवून जलसंपदा मंत्री पाटील यांनी तानाजी पाटील यांना बोलण्यास सांगितले आणि विनोदाने म्हणाले की, माझा टोपी-धोतरवाल्यांवर जास्त विश्वास आहे. सध्याचे व्हॉट्स ॲप वापरणारे कधी बदलतात, ते सांगता येत नाही, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT