Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणार : अजित पवार

अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाय योजना राबवण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना तात्काळ देण्यात येतील.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : नगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षास आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. नगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना दुर्दैवी असून या घटनेच्या उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाय योजना राबवण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना तात्काळ देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (Strict action will be taken against the culprits of fire accident in Nagar District Hospital : Ajit Pawar)

नगर जिल्हा रुग्णालयात कोविडच्या अतिदक्षता विभागात 17 कोविड रुग्ण उपचार घेत होते. त्यातील दहा जणांचा आज सकाळी अकराच्या सुमारास लागलेल्या आगीत मृत्यू झाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली होती, अशी अधिकृत माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये सहा पुरूष व चार महिलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण ज्येष्ठ नागरिक होते.

या आगीत रामकिसन विठ्ठल हरपुडे (वय 70, माका, ता. नेवासे), सीताराम दगडू जाधव (वय 83, बख्तरपूर, ता. शेवगाव), सत्यभामा शिवाजी घोडचौरे (वय 65, तेलकुडगाव, ता. नेवासे), कडूबाळ गंगाधर खाटिक (वय 65, पाथरवाला, ता. नेवासे), भिवाजी सदाशिव पवार (वय 80, किन्ही, ता. पारनेर), दीपक विश्वनाथ जेडगुले (वय 37, अश्वी, ता. संगमनेर), कोंडाबाई मधुकर कदम (वय 70, केडगाव, ता. नगर), आसराबाई गोविंद नांगरे (वय 58, शेवगाव, ता. शेवगाव), छबाबी अहमद सय्यद (वय 65, शेंडी, ता. नगर) आणि एक अनोळखी व्यक्ती अशा दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयातील अन्य रुग्णांच्या सुरक्षिततेची व आरोग्यसेवेची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आरोग्यमंत्र्यांकडून तातडीची मदत जाहीर

दरम्यान, आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत आहे. या दुर्घटनेची चौकशी नगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी दिली.

फडणवीसांची चौकशीची मागणी

नगर येथे जिल्हा रुग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे ट्विट राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

नगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT