Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Deshmukh Politic's : भाजपत साईड लाईन झालेल्या दोन देशमुखांना श्री सिद्धरामेश्वर पावणार; समर्थक नगरसेवकांसोबत एकत्र जाऊन घेतले दर्शन...

Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh News : सोलापुरातील भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्यातील राजकीय समन्वय वाढताना दिसत आहे. महापालिका आणि धार्मिक कार्यक्रमांत दोन्ही नेते एकत्र सक्रिय असल्याने चर्चा रंगली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 18 August : पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपच्या स्थानिक नेतृत्वापासून चार हात लांब राहणारे पक्षाचे दोन माजी मंत्री तथा ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्यातील राजकीय समन्वयाचा धागा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. महापालिकेचे रणांगण असो अथवा धार्मिक क्षेत्र दोन्ही देशमुख एकत्र बॅटिंग करताना दिसत आहेत. त्याचे प्रत्यंतर पहिल्याच श्रावण सोमवारी पुन्हा एकदा आले.

एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले दोन्ही देशमुख सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र आले. तेव्हापासून दोन्ही देशमुखांमध्ये ‘नांदा सौख्यभरे’ सुरू आहे. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही देशमुखांना वगळून पालकमंत्री आणि स्थानिक नेतृत्वाकडून निर्णयाची बॅटिंग करण्यात आली.

रचनात्मक व्यूहरचना आणि सत्तेचे पाठबळ यामुळे त्यांचा निर्णयाला यशही मिळत गेले, तसतसे दोन्ही देशमुख पक्षात वेगळे पडत गेले. नाही म्हणायला नव्या नेत्यांकडून भाषणात त्यांना मानसन्मान दिला जात होता. मात्र, राजकीय निर्णयाच्या सोंगट्या स्वतःच्या बाजूने पाडून घेत होते, त्यामुळे दोन्ही देशमुखांमध्ये अस्वस्थता दिसून येत होती.

नाही म्हटले तरी महापालिका निवडणुकीत आपल्या समर्थकांना निवडून आणण्यात दोन्ही देशमुखांना यश मिळाले, त्यामुळे सुभाष देशमुख यांनी दक्षिण, तर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुखांनी आपली ताकद राखली. मात्र महत्वपूर्ण निर्णयप्रक्रियेत त्यांना पहिल्यासारखे स्थान मिळत नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

महापालिका पदाधिकारी निवडीत महापौरपद कोठे गटाकडे, आर्थिक नाड्या हाती राखणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्षपद चाकोते यांच्याकडे गेले. नाही म्हणायला उपमहापौरपद सुभाष देशमुख यांच्या समर्थक ज्ञानेश्वरी देवकर यांना देण्यात आले आहे. मात्र, तेही नुसतेच नावाला असल्याचे दिसून येते. कारण अनेक महत्वाच्या पत्रकार परिषदांचे निमंत्रणसुद्धा त्यांना नसते, हे दिसून आले आहे. त्यांच्या कार्यालयासाठी लागणाऱ्या नव्या खुर्च्या खरेदीचेसुद्धा अधिकार नाहीत, हे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे.

सुभाष देशमुख गटाकडे नावापुरते उपमहापौरपद तरी आहे. मात्र विजयकुमार देशमुख यांचा गट सत्तेपासून वंचितच आहे. त्यामुळे दोन्ही देशमुखांच्या समर्थकांमध्ये नाराजीची भावना आहे. मात्र, सत्तेचे आणि पक्षश्रेष्ठींचे वारे सध्या ‘नवख्या’ दिशेने वाहत असल्याने हे दोन्ही देशमुख आणि त्यांचे समर्थक ‘वेट ॲड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे दिसून येते. हे दोन्ही माजी मंत्री एकत्र येऊन समर्थकांना ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत.

पहिल्या श्रावण सोमवारी या दोन्ही नेत्यांनी श्री सिद्धरामेश्वरांचे आपल्या समर्थकांसह एकत्रित दर्शन घेतले. या वेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पश्चिम मंडल अध्यक्ष महेश देवकर, नगरसेविका कलावती गदगे, नगरसेवक दीपक जमादार, सत्यजित वाघमोडे, शिवानंद पाटील, पदाधिकारी सोमनाथ केंगनाळकर, आनंद बिराजदार, आनंद गदगे, जीवन चाबूकस्वार आदी उपस्थित होते. दोन्ही देशमुखांच्या या देवदर्शन डिप्लोमसीतून समर्थकांना काय संदेश दिला जातो आणि शहराच्या राजकारणात काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT