Sharad Pawar Sarkarnma
पश्चिम महाराष्ट्र

NCP News : सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप, शहराध्यक्षांचा अवघ्या सहा महिन्यांत राजीनामा; नेमकं घडतंय काय?

Solapur NCP News : सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला गेल्या काही दिवसांपासून राजकीय गटबाजीचे ग्रहण लागल्याचे दिसून येत होते. राष्ट्रवादीची 'शिवस्वराज यात्रा' शहरात आल्यानंतर गटबाजी प्रकर्षाने जाणवू लागली.

Vijaykumar Dudhale

Maharashtra Political News: विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या पदाचा अवघ्या सहा महिन्यांत गटबाजीमुळे राजीनामा दिला आहे. सोलापूर शहरात काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन गटांत मोठ्या प्रमाणात कुरबुरी सुरू होत्या. त्यातून तर सुधीर खरटमल यांनी राजीनामा दिला नाही ना? अशी चर्चा सोलापूर शहरात सुरू आहे.

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला गेल्या काही दिवसांपासून राजकीय गटबाजीचे ग्रहण लागल्याचे दिसून येत होते. राष्ट्रवादीची 'शिवस्वराज यात्रा' शहरात आल्यानंतर गटबाजी प्रकर्षाने जाणवू लागली. विशेषत: शहराध्यक्षांविरुद्ध माजी महापौर, असे दोन गट सोलापूर शहरात काम करताना दिसून येत होते.

सोलापुरात 'शिवस्वराज यात्रा' आल्यानंतर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने माजी नगरसेवक आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले तौफिक शेख हे कार्यक्रम सोडून निघून गेले होते. हा कार्यक्रम एका शाळेच्या पटांगणावर घ्यायचे ठरले होते. असे असताना तो एका सभागृहात घेण्यात आल्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट नाराज होता. त्या गटाकडून शहराध्यक्ष खरटमल यांच्या विरोधात खासगीत आरोप करण्यात येत होते. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारणीही अद्याप जाहीर झालेली नाही, त्यामुळेही शहरातील काही पदाधिकाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.

याच नाराजीच्या भावनेतून माजी महापौर हे काही दिवसांपासून पक्षाच्या कार्यक्रमापासून अलिप्त होते. पक्षातील या गटबाजीकडे वरिष्ठ नेत्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले.

दरम्यान, माजी महापौर महेश कोठे आणि शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्यात काही दिवसांपूर्वी शाब्दिक चकमक झाली होती. तो वाद वाढत गेल्याची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात होती. त्यातूनच शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनामा देताना सुधीर खरटमल यांनी म्हटले, "ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली होती. या सहा महिन्यांच्या कालावधीत मी पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले. या पदावर काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पक्षात काम करताना मला अनेकांनी सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण, मी या पदावर आता काम करू शकत नाही, त्यामुळे मी स्वखुशीने शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा."

खरटमल यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या यांना सादर केला आहे. आता पक्ष सुधीर खरटमल यांचा राजीनामा स्वीकारणार की वाद मिटवून पुन्हा सर्वांना एकत्रित आणणार, याकडे सोलापूर शहराचे लक्ष लागले आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT