Kolhapur Political News : कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात एकाच वेळी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीला मोठा झटका बसला बसला आहे. जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने भाजपचे जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षासह पंचायत समितीच्या सभापतींचेही जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहेत. यामुळे पट्टणकोडोली येथे विरोधकांनी गुलाल उधळत जल्लोष केला आहे. तर गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाचा जातीचा दाखला अवैध ठरल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
पट्टणकोडोली जिल्हा परिषद निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले भाजपचे जिल्हा परिषद सदस्य महेश ऊर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील (चंदूर) यांचा लिंगडेर जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आला. यामुळे आमदार राहुल आवाडे यांच्यासह भाजपला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.
बसगोंडा पाटील यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याची माहिती ऑनलाईन पोर्टलवर देण्यात आली आहे. तर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर येथे झालेल्या अंतिम सुनावणीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून या हा निर्णयाची माहिती त्यांना टपालाद्वारे पाठविण्यात येणार आहे. लिंगडेर यांच्या अनुसूचित प्रवर्गातील जातीच्या दाखल्यावर पुरुषोत्तम भुजिंगे आणि तुषार बाणदार यांनी आक्षेप घेतला होता.
या एका निकालामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असतानाच जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने राष्ट्रवादीला डबल धक्का दिला आहे. समितीने गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष महेश महादेव तुरबतमठ यांचा बेडा-जंगम जातीचा दाखला जातपडताळणीमध्ये अवैध ठरला. तसेच आजरा पंचायत समितीच्या सभापती जयश्री संजय गाडे यांचा देखील कुणबी जातीचा दाखला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अवैध ठरविला आहे. या निकालामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. तर विरोधी भाजपमध्ये आनंदाला उधाण आले आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतीलच पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. येथे भाजप शिंदेंची शिवसेना,जनता दल आणि जनसुराज्यने एकत्र येत महायुती केली. तर याविरोधात राष्ट्रवादी एकटा लढला. यावेळी नगराध्यक्षपदासह 18 जागा राष्ट्रवादीने जिंकत महायुतीचे जिल्ह्यात पाणीपत केले. तर महेश तुरबतमठ 12350 मते घेत नगराध्यक्ष झाले.
या निवडणुकीवेळीच बिलावर यांनी तुरबतमठ यांच्यावर अर्ज छाननीच्या वेळी अक्षेप घेतला होता. तसेच हिरेमठ यांच्याही बेडा-जंगम जातीच्या दाखल्याला हरकत घेतली होती. तर जातपडताळणी समितीकडे तक्रार करत उच्च न्यायालयातही दाद मागितली होती. यानंतर आता राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष महेश महादेव तुरबतमठ यांचा बेडा-जंगम जातीचा दाखला जातपडताळणीमध्ये अवैध ठरला.
दरम्यान यावेळी आजरा पं. स.च्या सभापती जयश्री गाडे यांचा देखील कुणबी जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला आहे. याबाबत समितीच्या अध्यक्ष सुषमा सातपुते, सदस्य भारत केंद्रे व सदस्य सचिव संभाजी पोवार यांनी अंतिम निकाल दिला आहे. या निकालामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून एकच खळबळ उडाली आहे. सभापती जयश्री गाडे यांच्या दाखल्यावर साधना केसरकर यांनी अक्षेप घेतला होता.
या निकालामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का बसला असून एकच खळबळ उडाली आहे. साधना संजय केसरकर यांनी गाडे यांच्या कुणबी जात दाखल्याबाबत पडताळणी समितीकडे आक्षेप घेतला होता. या निर्णयानंतर सभापती जयश्री गाडे यांनी तक्रारदारांनी राजकीय वैमनस्य व नैराश्यतून आपल्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याविरोधात समितीला सर्व अधिकृत पुरावे दिले होते. आता समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. यामुळे या निर्णयाविरोधात विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे दाद मागणार असल्याचे त्या म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.