Sunil Gadakh : नगर आणि शेवगाव मध्ये जोडून असलेला नेवासे तालुका यापूर्वीच्या आमदारांनी जाणीवपूर्वक भकास ठेवला. चाळीस वर्षांचा अनुशेष भरून काढण्यासाठी माजी मंत्री शंकरराव गडाखांनी हाती घेतलेला विकासकामांचा सपाटा विरोधकांच्या डोळ्यात आता खुपू लागला आहे. गडाखांच्या नावाने कितीही शिव्या दिल्या तरी कामांचा धडाका थांबणार नाही, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख ( Sunil Gadakh ) यांनी केली.
घोडेगाव (ता.नेवासे) येथे माजी मंत्री गडाख यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ४८ कोटी ८३ लाख रुपये खर्चाच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात गडाख बोलत होते. मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, संचालक बाबुराव चौधरी, नानासाहेब रेपाळे, दिलीप लोखंडे, वसंत सोनवणे, सेवा संस्थेचे अध्यक्ष राम सोनवणे उपस्थित होते. अशोक येळवंडे व सचिन चोरडिया यांचे भाषण झाले.
माजी आमदार दादा पाटील शेळके, शिवाजी कर्डिले, तुकाराम गडाख, बाळासाहेब मुरकुटे व अन्य आमदारांनी ४० वर्षांच्या राजकारणात नेवासे तालुक्यात किती दिवे लावले असा प्रश्न उपस्थित करुन माजी मंत्री गडाखांनी अडीच वर्षांत गाव तेथे विकासाचा संकल्प करुन कोट्यावधीचा निधी मंजूर करून आणल्याने अनेकांच्या पोटात कळ येवू लागली, असे सांगून गडाख यांनी पालकमंत्री नेवाश्यात पीक पाहणीला आले की वाळू पाहणी करायला आले, असा चिमटा घेवून तालुक्यातील काही महाभागांनी पंधराव्या वित्त आयोगातील कामे बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगून गडाखांना शिव्या देवून राजकारणाची पोळी भाजण्याचे दिवस कायम नसतात असा इशारा विरोधकांना दिला.
घोडेगावातील पाणी योजनेचे श्रेय घेवू पाहणाऱ्या सरपंचाने गावात एकाही गटारीचे काम केले नाही. दुकानाच्या गादीवरुन गावाचा कारभार बंद करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले तर येथील ग्रामपंचायतीवर निश्चित भगवा फडकेल असा निर्धार व्यक्त करुन पाचेगावच्या नदीवरील पुलाचे उदघाटन व लोहगाव येथील पशुपालकास कारण नसताना धनादेश देण्याकरीता केलेली लुडबुड केविलवाणी आहे अशी टीका माजी आमदार मुरकुटे यांचे नाव न घेता केली. आमच्या संयमाचा गैरफायदा महागात पडेल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सोनवणे यांनी केले. बाळासाहेब सोनवणे यांनी आभार मानले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.