Supriya Sule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Supriya Sule : नाव चालतं, मग मुलगा, नातू का चालत नाही?

आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्या वतीने पारनेर-नगर मतदारसंघातील सुमारे एक लाख महिलांना सलग सात दिवस दोनशे बसमधून मोहटादेवी दर्शनासाठी नेण्यात येत आहे.

मार्तंड बुचुडे

Supriya Sule : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे आता नेमकी शिवसेना कोणाची व धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. ही लढाई दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव चालते, मग बाळासाहेबांसाठी सर्वस्व असलेला मुलगा आणि नातू का चालत नाही, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी व्यक्त केला.

आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्या वतीने पारनेर-नगर मतदारसंघातील सुमारे एक लाख महिलांना सलग सात दिवस दोनशे बसमधून मोहटादेवी दर्शनासाठी नेण्यात येत आहे. यात्रेचा प्रारंभ काल (ता. 27) सुपे येथून सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राणी लंके, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, अॅड. राहुल झावरे, सुदाम पवार, बा. ठ. झावरे, गणेश साळवे, बाळासाहेब पोटघन, पूनम मुंगशे, राजेश्वरी कोठावळे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी खासदार सुळे बोलत होत्या.

सुळे म्हणाल्या, की तुमच्यात मतभेद असतील तर तुम्ही दुसरे घर करा. तुम्हालाही शुभेच्छा. मात्र, अशाप्रकारे ठाकरे कुटुंबावर आरोप करणे चुकीचे आहे. शरद पवार यांच्यावर ज्यावेळी काँग्रेसने कारवाई केली, त्यावेळी साहेबांनी स्वतंत्र पक्ष काढला. मात्र, काँग्रेस माझी आहे, त्यातील माणसे माझी आहेत, असे कधी म्हटले नाही. सध्याचे राजकारण पाहून बाळासाहेबांना खूप वेदना होत असतील.

चाकणकर म्हणाल्या, की कोरोनाचे नियम पाळल्याने हिंदू सण आता साजरे करू शकलो आहोत. महिलांना देवदर्शनाच्या माध्यमातून एक वेगळे समाधान आहे. समाजात वाईट विचारांचा व महागाईच्या महिषासुराचा वध करण्यासाठी सक्षम सरकार उभे करण्यासाठी महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.

महिला मला संजय गांधी निराधार योजनेतील पैसे देऊन निवडणुकीत मदत करतात. सत्कार, बुकेला फाटा देत 15 हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत केली. जनता माझ्या पाठीशी आहे. माझ्या पगारातून 300 मुलांचे पालकत्व घेतले असून, पैशांअभावी कोणाचेही शिक्षण अडणार नाही.

- नीलेश लंके, आमदार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT