Sachin Kalyanshetti- Suresh Hasapure Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Suresh Hasapure : सोलापूरच्या सहकारात सुरेश हसापुरेंचा दबदबा कायम; तिसऱ्यांदा 'डीसीसी' बँक गाठण्यासाठी समीकरणं जुळवली

Solapur Dcc Bank Election 2026 : सोलापूर डीसीसी बँकेच्या सोसायटी मतदारसंघात सुरेश हसापुरे यांनी सहकारातील आपला गड कायम ठेवला आहे. दोनदा विजयानंतर आता तिसऱ्यांदा संचालक होण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे.

प्रमोद बोडके

Solapur, 21 August : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सोसायटी मतदारसंघ म्हणजे त्या त्या तालुक्यातील दिग्गज आणि प्रस्थापित नेत्यांचा बँकेत येण्याचा राजमार्गच मानला जातो. राजकारणात जिल्हा परिषद आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे जाऊ न शकलेले सुरेश हसापुरे यांनी सहकाराचा गड मात्र कायम राखला आहे. या तालुक्यात अनेक दिग्गज नेते होऊन गेले आणि सध्या आहेत. मात्र, सहकाराचा गड हसापुरे यांनी आजही कायम ठेवला आहे. सोसायटी मतदारसंघातून डीसीसी बॅंकेच्या निवडणुकीत दोनदा विजयी झाल्यानंतर तिसऱ्यांदा हा गड राखण्याची तयारी हसापुरे यांनी पूर्ण केल्याचे सध्या दिसत आहे.

जिल्ह्याच्या सहकारातील दिग्गज नेते सहकारमहर्षी (कै.) वि. गु. शिवदारे यांनी तब्बल ४० वर्षे या मतदारसंघातून जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व केले. त्या काळात (कै.) आनंदराव देवकते आमदार झाले, मंत्री झाले; मात्र सहकाराच्या राजकारणात ते कधी पडले नाहीत. राजशेखर शिवदारे यांनी २००५ मध्ये एक टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

त्याच वर्षी आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून (मतदारसंघ पुनर्रचनेत हा मतदारसंघ वगळला) हसापुरे यांनी पहिल्यांदा जिल्हा बँकेत प्रवेश केला. त्यानंतर २०१०च्या निवडणुकीत सुरेश हसापुरे यांनी राजशेखर शिवदारे यांचा सोसायटी मतदारसंघातून पराभव करत हा गड आपल्या ताब्यात घेतला. २०१५ मध्ये अप्पासाहेब वडकबाळकर यांचा पराभव करून हसापुरे तिसऱ्यांदा बँकेचे संचालक झाले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील २७ गावे विधानसभेसाठी अक्कलकोटला जोडली आहेत. अक्कलकोटची आमदारकी २०१९ पासून सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे आहे. आमदारकीच्या पहिल्या टर्मपासूनच कल्याणशेट्टी यांनी २७ गावांतील सोसायट्यांच्या राजकारणात सुप्तपणे शिरकाव केला आहे. आता त्या २७ गावांतील सोसायट्यांमध्ये आमदार कल्याणशेट्टी यांचा गट पॉवरफुल्ल मानला जातो.

गेल्या वर्षी झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार कल्याणशेट्टी-हसापुरे गटाची ताकद दिसली. बाजार समितीच्या माध्यमातून कल्याणशेट्टी-हसापुरे यांचे जुळलेले सूत आता हसापुरे यांना संचालक होण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीत हसापुरेंच्या विरोधात कोण? हसापुरेंना रोखण्यासाठी सर्वपक्षीय समविचारींची मोट कोण बांधणार, यावर येथील निवडणुकीची चुरस अवलंबून आहे.

दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीप माने, बाजार समितीचे माजी सभापती राजशेखर शिवदारे आणि इंदुमती अलगोंडा पाटील यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष असणार आहे. कारण या नेतेमंडळींच्या भूमिकेवरचे डीसीसीच्या लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे.

मोहिते पाटलांची भक्कम साथ

सुरेश हसापुरे यांचे वडील सिद्रामप्पा हसापुरे हे सोसायटीचे सचिव होते. सचिवाचा मुलगा जिल्हा बँकेचा संचालक होण्याची किमया सुरेश हसापुरे यांनी करून दाखवली आहे. पहिल्यांदा संचालक होण्यासाठी त्यांना माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भक्कम साथ मिळाली.

संचालक झाल्यानंतर हसापुरे यांनी डीसीसीच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यात मोकळ्या हाताने कर्जवाटप केल्याने त्यांची सहकारातील पकड दिवसेंदिवस मजबूत झाल्याचे दिसले. दुर्बल मतदारसंघातून डीसीसीत आलेले हसापुरे सोसायट्यांच्या राजकारणात सध्या ‘मार्बल’ झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT