

Solapur, 20 August : भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक आज (२० ऑगस्ट) सोलापुरात झाली. एसआयआर, संघटनात्मक बांधणी आदी मुद्यांवर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली असली तरी भाजपने ‘मिशन पदवीधर’ हाती घेतल्याचे दिसून आले. पुणे पदवीधरचे प्रतिनिधीत्व केलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही युक्तीच्या गोष्टी सांगितल्या, तर पालकमंत्री जयकुमार गोरेंनी ५०० मतदारांची नोंदणी करणाऱ्या सदस्यांना सर्वाधिक निधी दिला जाईल, अशी घोषणा केली.
पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. मात्र, काही कारणांमुळे ते येऊ शकले नाहीत. मात्र, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, SIR महाराष्ट्र प्रभारी भगवानदास सबनानी, SIR प्रदेश संयोजक डॉ. किरीट सोमय्या उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाने पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांवर वर्चस्व मिळविले आहे, त्यामुळे भाजपचे पुढचे लक्ष्य गेल्या वेळी हातातून गेलेला पदवीधर मतदारसंघ परत मिळविण्याचे आहे. त्यामुळे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावर भाजपने लक्ष्य केंद्रीत केले आहे, त्याचे प्रतिबिंब आजच्या बैठकीत दिसले.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एसआयआरवर भर दिला. अनेक लोकप्रतिनिधी एसआयआरकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगून त्यांनी लक्ष द्यावे; त्यावरच पुढच्या निवडणुकीतील यश अवलंबून आहे, त्यामुळे गाफील राहू नका, असा सल्लाही त्यांनी चव्हाण यांनी दिला. प्रदेशाध्यक्षांनी एसआयआरवर भर दिलेले असताना प्रामुख्याने चंद्रकांतदादा पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र शिक्षक आणि पदवीधरच्या तयारीवर जोर दिला.
चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाचा इतिहास सांगितला. या मतदारसंघातून प्रकाश जावडेकर आणि स्वतः दोन वेळा निवडून आल्याचे सांगितले. मात्र, मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचे शल्यही त्यांनी बोलून दाखवले. हे सांगताना चंद्रकांतदादांनी आगामी निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर पदवीधर नोंदणी कशी करायची, याची स्ट्रॅटेजी सांगितली.
दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या शैलीत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा आढावा घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी झाली असून सांगलीत ७७ हजार, तर सोलापूर जिल्ह्यात सर्वांत कमी ३३ हजार नोंदणी झाल्याचे सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोरे यांनी या वेळी अनोखी घोषणा केली.
पंचायत समिती सदस्यांनी किमान ५० मतदारांची, तर जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांनी १०० मतांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ठ ग्रामविकास मंत्री गोरे यांनी दिले. जे सदस्य ५०० मतदारांची नोंदणी करतील, त्यांना सर्वाधिक निधी देण्याची घोषणाही या वेळी गोरेंनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.