Sushil Kumar Shinde
Sushil Kumar Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sushil Kumar Shinde News : सुशीलकुमार शिंदेच सोलापूर लोकसभेचे उमेदवार? : ‘जनवात्सल्य’वर हालचाली वाढल्या; नेत्यांसोबत खलबतं

सरकारनामा ब्यूरो

शिवाजी भोसले

सोलापूर : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) हे मागील अनेक दिवसांपासून सोलापुरात तळ ठोकून आहेत. सोलापूर (Solapur) लोकसभा आणि महानगरपालिका या दोन्ही महत्त्वाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारीच्या पार्श्वभूमीवर, त्यांचा हा मुक्काम असल्याची चर्चा रंगली आहे. लोकसभा मतदार संघातील अनेक नेतेमंडळींसोबत त्यांच्या गाठीभेटी हेात आहेत. (Sushil kumar Shinde extended his stay in Solapur to prepare for the Solapur Lok Sabha)

विशेष म्हणजे लोकसभेच्या आखाड्यात दस्तूरखुद्द सुशीलकुमार शिंदे हे उभे ठाकणार की त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या उतरणार या संदर्भात अद्याप स्पष्टता नसली तरी, सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र आत्तापासूनच लोकसभेची तयारी सुरू केली आहे.

काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदारकीच्या मागील दोन टर्ममध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत, त्यामुळे सोलापूर लोकसभा हा भाजपचा गड मानला जात आहे. या मतदारसंघात शिंदे यांना दोन वेळा हार पत्करावी लागली. जिव्हारी लागलेला पराभव पुसून काढण्यासाठी सुशील कुमार हे या खेपेस सोलापूर लोकसभेची निवडणूक पुन्हा लढतील आणि विजयाचा गुलाल अंगावर घेऊनच राजकीय निवृत्ती घेतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतःहून सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. लोकसभा लढणार नसल्याचे सांगूनही यापूर्वी तीन निवडणुका शिंदे यांनी लढवलेल्या आहेत. त्याप्रमाणेच वर्षभरावर येऊन ठेपलेली सोलापूर लोकसभेची निवडणूकही शिंदे हेच लढवतील, अशी खात्री जाणकारांना वाटते.

दुसरीकडे, त्यांच्या कन्या प्रणिती याही लोकसभेची निवडणूक लढवतील, असे तर्क आणि आडाखे बांधले जात आहेत. पित्याप्रमाणे दिल्लीच्या राजकारणात जाऊन स्वतःचा स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नांतूनच प्रणिती शिंदे या गांधी घराण्याशी जवळीक साधत आहेत.'भारत जोडो' यात्रेसाठी राहुल गांधी यांच्या समवेत त्यांनी दिलेले योगदान हे त्याचेच द्योतक असल्याचे मानले जाते. सुशीलकुमारांची प्रकृती, त्यांचे झालेले वय हे लक्षात घेता खुद्द शिंदे हे प्रणिती यांनाच लोकसभेच्या आखाड्यात उतरवतील, अशीही अटकळ बांधली जात आहे.

सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसच्या वतीने आपण स्वतः उभे राहवू किंवा कन्या प्रणिती या आखाड्यात असतील, याचा जरी निर्णय झाला नसला तरी या दोघांकडून लोकसभेची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील अनेक दिवसांनंतर सुशीलकुमार शिंदे हे सोलापुरात तळ ठोकून आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अक्कलकोट, मंगळवेढा,पंढरपूर, मोहोळ, दक्षिण आणि उत्तर सोलापूर या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासह सोलापूर शहरातील शहर मध्य आणि सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील अनेक नेतेमंडळी, प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी शिंदे हे निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करून कानोसा घेत आहेत. त्यांच्या या हालचाली लोकसभा निवडणुकीची तयारी असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने सुशीलकुमार यांचा सोलापुरातील मुक्काम भविष्यात वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुशीलकुमारांचा मुक्काम अन् निवडणुकांची खलबते

सोलापूर लोकसभा आणि महानगरपालिका या दोन्ही महत्त्वाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे हे मागच्या अनेक दिवसांपासून सोलापुरात तळ ठोकून आहेत. सोलापुरातील सात रस्ता परिसरातल्या ‘जनवात्सल्य’ या निवासस्थानी त्यांनी निवडणुकीच्या संदर्भातील खलबते सुरू ठेवली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT