Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress Politics: मोदींचं कौतुक,भाजप प्रवेशाची ऑफर, 'RSS'च्या पुस्तकाचं वाचन...; काँग्रेसच्या बड्या नेत्यानं दिवाळीपूर्वीच फोडले फटाके

Sushilkumar Shinde Political News: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील काँग्रेस पक्षाचा प्रमुख चेहरा आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. मुलगी प्रणिती शिंदे या सोलापूरच्या काँग्रेस पक्षाच्या विद्यमान खासदार असताना आता सुशीलकुमार शिंदेंनी केलेलं मलाही भाजपमध्ये येण्याची ऑफर होती या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील काँग्रेस पक्षाचा प्रमुख चेहरा आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. मुलगी प्रणिती शिंदे या सोलापूरच्या काँग्रेस पक्षाच्या विद्यमान खासदार असताना आता सुशीलकुमार शिंदेंनी केलेलं मलाही भाजपमध्ये येण्याची ऑफर होती या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच एकीकडे काँग्रेस पक्षासह विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात असतानाच शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातून कितीतरी चांगल्या गोष्टीही घडतात असंही म्हटलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती,असाही गौप्यस्फोटही केला. ते म्हणाले, मलाही इकडे (भाजपमध्ये) या असं म्हटलं गेलं. मात्र, मी म्हटलं मी तिकडे (काँग्रेस) आहे, तर इकडे(भाजप) मध्ये येऊन परत काय करणार असं त्यांना विचारलं. मी जिथे आहे (काँग्रेसमध्ये) तिथलंच काम करणार, इकडं (भाजपमध्ये) येऊन परत तुमच्यात ढवळाढवळ नको असंही त्यांना सांगितल्याचं शिंदेंनी म्हटलं.

भाजपमध्ये आलेल्या नवीन माणसांचे काय हाल होतात हे सुद्धा मी बघितलेलं आहे.आता नाही 25 वर्षांपूर्वी सुद्धा असंच होत होतं.एकत्रित सगळेच गेले परत 4 ते 5 वर्षात पुन्हा परतले. राजकारणात देखील चुका होत असतात. त्यामुळे पत्रकारांनी त्या चुकांचे विश्लेषण केले पाहिजे, असंही शिंदे म्हणाले.

सुशीलकुमार शिंदे यांनी सध्या सुरू असलेल्या आंदोलनं,मोर्चांवरही भाष्य करताना आंदोलकांचे कान टोचले. ते म्हणाले, नकळत एखाद्याकडून जर चूक झाली असेल तर ती समजून घेतली आहे. आपली लोकशाही ही वर चढत जाणारी आहे.त्याला काळिमा लागता कामा नये,असं त्यांनी सांगितलं.

तसेच देशाचे पंतप्रधान हे जितकं माझ्याशी बोलतात, तितकंच ते शरद पवारांशीही बोलतात. शरदराव तर त्यांना बारामतीला घेऊन जातात,कायकोण विचारत नाही,उद्घाटनाला वगैरे गेले, तर काही बिघडत नाही,अशी मिश्किल टिप्पणीही माजी केंद्रीय मंत्री शिंदेंनी केली. यावेळी त्यांनी कितीतरी चांगल्या गोष्टी पंतप्रधान मोदींकडून होतात, वाईटही घडल्या जातात,हेही अधोरेखित केलं.

प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरसोबतच्या नात्यामुळे आणि सार्वजनिक उपस्थितीमुळे चर्चेत आलेल्या शिखर पहारियानं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी केली होती. या बॅनरबाजीवरुन राजकीय उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या.मात्र,आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचा नातू शिखर पहारियाची पाठराखण केली आहे. त्यांनी या संदर्भात बोलताना 'पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले म्हणून काय बिघडले' म्हटलं आहे.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले,परवा बातमी आली की, माझ्या नातवानं पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले. एक दिवस असं केल्यानं काय बिघडलं,मी सुद्धा नुकताच पंतप्रधानांना भेटलो.यामुळे काहीही बिघडत नाही आणि आपली फिलोसॉफीही बदलत नाही, असं परखड मतही काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केलं आहे.

मध्यंतरी RSS चे एक पुस्तक प्रकाशित झाले होते. मी ते पुस्तक आवर्जून चाळून बघितले. पॉलिटिकलं सायन्सचा विद्यार्थी म्हणून हे सगळं महत्वाचं आहे. काल मार्क्सवादी काम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते सोलापुरात येऊन गेले त्यांच्याविषयी ही मी माहिती घेतली. त्यांचंही साहित्य मी वाचतो. कम्युनिस्ट पार्टीचा इतिहास देखील किती मोठा आहे, असंही सुशीलकुमार शिंदेंनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT