Sugarcane cutting off
Sugarcane cutting off sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : स्वाभिमानीच्या आंदोलनाला मोठे यश; ऊसतोड बंद

सरकारनामा ब्युरो

कऱ्हाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत काल इंदोली फाट्यावर ऊस वाहतुक करणारा ट्रॅक्टर पेटवुन दिला. त्यानंतर वाठारला कृष्णा साखर कारखाना व राजारामबापू साखर कारखान्यांकडे सुरु असलेली ऊस वाहतूक रोखली. त्याची धास्ती घेऊन आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी एकही ट्रॅक्टर ऊस वाहतुक करताना दिसला नाही. त्या आंदोलनाला शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिल्याने आज ऊसतोडी बंदच राहिल्या. दरम्यान, आज महत्वाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काल आणि आज ऊसतोड बंद आंदोलन पुकारले होते. त्या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्री इंदोली येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटवण्यात आला. दरम्यान काल सकाळी वाठार येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे व शेतकऱ्यांनी कृष्णा व राजारामबापू साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतुक रोखून धरली.

त्यानंतर काही ठिकाणी आंदोलनाची माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या ऊसतोडी बंद करण्यात आल्या. दरम्यान जे ट्रॅक्टर ऊसाने भरुन कारखान्याकडे निघाले होते ते पोलिस बंदोबस्तात काल रात्री कारखान्याकडे रवाना करण्यात आले. काल झालेल्या आंदोलनाची धास्ती घेवुन आज दुसऱ्या दिवशी ऊसतोडी बंद ठेवण्यात आल्या.

त्याला ट्रॅक्टर चालक, मालक व शेतकऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आज दिवसभरात आंदोलन झाले नाही. त्यामुळे एकही ट्रॅक्टर ऊस वाहतुक करताना दिसला नाही. दरम्यान ज्या ठिकाणी आंदोलन होईल अशी शक्यता होती त्या ठिकाणी पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

स्वाभिमानीचे आंदोलन यशस्वी ः देवानंद पाटील

स्वाभिमानीचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल आणि आज दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलनाची हाक दिली होती. कऱ्हाड तालुक्यात आम्ही स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो होतो. त्यामुळे आज एकही वाहन ऊसवाहतुक करताना दिसले नाही. आम्ही शेतकऱ्यांनाच चारपैसे चांगले मिळावे यासाठी लढत आहोत. याची जाण शेतकऱ्यांनी ठेवुन आमच्या आंदोलनाला पाठिंबा देत ऊसतोडी आज बंद ठेवुन सहकार्य केले. त्यामुळे स्वाभिंमानी शेतकरी संघटनेने पुराकलेले आंदोलन सातारा जिल्ह्यात यशस्वी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT