Solapur, 10 February : माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे दोन पुतणे त्यांच्या विरोधात जिल्हा परिषद निवडणुकीत उतरले होते. या दोन्ही पुतण्यांनी आमदार सावंत यांच्यावर हल्लाबोल करत काकांना लक्ष्य केले होते. माढा तालुक्यातील मानेगाव गटातील विजयानंतर शिवाजी सावंत यांनी त्यांचे बंधू तानाजी सावंत यांच्यावर उघडपणे हल्ला केला आहे. तानाजी सावंतांनी एक नव्हे; तर दोन पुतण्यांना पाडण्याचा प्रयत्न केला. आमच्या विजयाने त्याला दणदणीत उत्तर मिळालं आहे, असं टोलाही शिवाजी सावंतांनी माजी मंत्री सावंतांना लगावला.
पृथ्वीराज शिवाजी सावंत यांनी मानेगाव गटातून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) तिकिटावर सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीतील विजयानंतर बोलताना शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांनी भाऊ तानाजी सावंतांवर गंभीर आरोप केले.
शिवाजी सावंत म्हणाले, भारतीय जनता पक्षाने जो आमच्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली, त्याला आम्ही पात्र ठरलो आहोत. माढा तालुक्यातील जनता आमच्यासोबत आहे, हे सिद्ध झालं आहे. आमचं राजकारण तानाजी सावंतावर (Tajani Sawant ) अवलंबून नाही. आमच्यावर त्याचं राजकारण अवलंबून होतं. पण त्याला वाटत होतं की, मी आहे म्हणून आमचं राजकारण चालतंय. त्याला आजच्या विजयाने दणदणीत उत्तर मिळालं आहे.
परांड्यात आमचा पुतण्या धनंजय सावंत यालाही पाडण्याचा प्रयत्न तानाजी सावंत याने केला. पण, तोही २२०० मतांनी विजयी झाला. तानाजी सावंतच्या जीवावर आमचं राजकारण नाही, तानाजी सावंताचं राजकारण, जो माजी मंत्री आहे, त्याचं राजकारण आमच्या जीवावर आहे. त्याच्या नाही, असा उघड इशाराही शिवाजी सावंतांनी तानाजी सावंतांना दिला.
ते म्हणाले, आमचं राजकारण हे जनतेच्या पाठिंब्यावर चालतं. पैशांनं नाही. त्याला वाटतं की पैशानं सगळं चालतं. पण पैशानं काहीही विकत घेता येत नाही. माणसं तर मिळत नाहीतच. त्याला माणसं कमवावी लागतात. त्यांची एक कोटी, दोन कोटीची ती क्लिप ऐकूनच मी सांगतो, पैशानं माणसं मिळत नाहीत, ती कमवावी लागतात आणि टिकवावी लागतात. त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. माढ्याची ही जनता सावंत कुटुंबासोबत आहे, हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
पृथ्वीराज सावंत यांच्या विजयाचे श्रेय जनता, कार्यकर्त्यांना आहे. अनेक वर्षांनंतर सावंत कुटुंबात मोठ पद आलं आहे, त्याचा आनंद आहे. लोकांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला, त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही आगामी काळात काम करणार आहोत, असा विश्वासही सावंतांनी बोलून दाखवला.
पृथ्वीराज सावंत यांना जिल्हा परिषदेत काय संधी द्यायची, याचा निर्णय भारतीय जनता पक्ष ठरवेल, असे सांगून त्याबाबत जास्त बोलणे शिवाजीराव सावंत यांनी टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.