Tanaji Sawant
Tanaji Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात सावंतसेना होणार ‘पॉवरफुल्ल’!

प्रमोद बोडके

सोलापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आज (ता. ३० जून) अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना संधी मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या बंडात सुरुवातीपासून साथ देणारे माजी मंत्री, आमदार डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे राजकीय वजन शिंदे सरकारमध्ये वाढणार असल्याचे आता जवळपास निश्‍चित झाले आहे. सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख काम पाहणाऱ्या आमदार सावंत व त्यांच्या समर्थकांचे जिल्ह्याच्या राजकारणात वजन वाढणार असल्याचे मानले जात आहे. (Tanaji Sawant's political weight will increase in Eknath Shinde's government)

सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील साखर कारखाने, पुणे परिसरातील शिक्षण संस्था यामुळे जवळपास तीन जिल्ह्यांमध्ये आमदार सावंत यांचा प्रभाव आहे. त्यांना शिंदे सरकारमध्ये चांगल्या मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीकडून शिवसैनिकांवर होणारा अन्याय या बद्दल आमदार सावंत यांनी 2019 च्या आगोदरपासूनच सडकून टिका केली होती. सोलापूरच्या शिवसेनेतील जुन्या नेत्यांची साथ आमदार सावंत यांना मिळाल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते जिल्ह्याच्या शिवसेनेत वादग्रस्त ठरले होते.

आमदार तानाजी सावंत यांच्यासोबत जिल्ह्यातून सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात सुरुवातीपासूनच साथ दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात जसे वजन आमदार सावंत यांचे वाढणार आहे तसेच वजन आमदार पाटील यांचेही वाढले जाण्याची शक्‍यता आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसनेचे नेतृत्व आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात कोण करणार? हा देखील कळीचा मुद्दा आहे. शिवसेनेच्या या नेतृत्वावरच ठाकरे सेनेची आगामी वाटचाल व भवितव्य अवलंबून आहे.

माजी आमदार नारायण पाटील जुळवून घेणार का?

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत करमाळ्याचे तत्कालिन आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी कापून राष्ट्रवादीतून आलेल्या रश्‍मी बागल यांना उमेदवारी दिली. उमेदवारी कापण्यात आमदार सावंत यांचा हात असल्याचा आरोप माजी आमदार नारायण पाटील यांनी केला होता. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर माजी आमदार नारायण पाटील यांनीही शिंदे यांना समर्थन दिले होते. माजी आमदार पाटील हे आगामी काळात आमदार सावंत यांच्यासोबत जुळवून घेणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

सावंतांच्या जवळ असणाऱ्यांना चांगल्या संधीची शक्यता

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शिवसनेचे संपर्कप्रमुख म्हणून आमदार सावंत यांनी अनपेक्षितरित्या माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार दिलीप माने, रश्‍मी बागल, नागनाथ क्षीरसागर यांना शिवसेनेची उमेदवारी दिली होती. जिल्ह्यातील सहापैकी पाच जागांवरील उमेदवार पराभूत झाले, शहाजी पाटील हे सांगोल्यातून सेनेचे एकमेव आमदार झाले. त्यानंतर शिवसेनेत प्रचंड गदारोळ झाला होता. आमदार सावंत यांच्याशी 2019 मध्ये जवळिक आलेल्या सेना उमेदवारांना शिंदे सरकारमध्ये चांगली संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

भाजपमधील कोण-कोण मंत्री होणार?

ठाकरे सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची अनेकांना अपेक्षा होती. एकनाथ शिंदे यांचे नाव अनपेक्षिपतणे पुढे आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साहाला वेसण बसली आहे. भाजपच्या कोट्यातून जिल्ह्यातील कोणा कोणाला मंत्रीपद मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते यांच्या समर्थकांनी आतापासूनच "लाल दिवा आपलाच', पालकमंत्री आपल्याकडेच अशा पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT