Rajesh Kshirsagar, Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Assembly Election : उत्तरेत शिंदेसेनेचं भवितव्य काँग्रेसचा उमेदवार ठरवणार

Kolhapur North Assembly Constituency : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील लढत देखील तितकीच लक्षवेधी ठरणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील बंडखोरांची संख्या आणि अंतर्गत कुरघोडी यावर दोन्ही बाजूच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 17 Oct : कोल्हापूर दक्षिण पाठोपाठ कोल्हापूर उत्तर विधानसभा (Kolhapur North Assembly) मतदारसंघातील लढत देखील तितकीच लक्षवेधी ठरणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील बंडखोरांची संख्या आणि अंतर्गत कुरघोडी यावर दोन्ही बाजूच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.

मागील इतिहासाचा आढावा घेतला तर अंतर्गत कुरघोडीमुळेच उमेदवारांना फटका बसत आला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात वाढलेले हिंदुत्व, भाजपच्या मतदानाचा टक्का, आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटाची व्यक्तिगत ताकद जमेची बाजू महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने आहे.

तर महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचा निष्ठावंत कार्यकर्ता, आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट या महाविकास आघाडीच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र, प्रत्येक पक्षातून इच्छुक असल्याने एकमेकांचा काटा काढण्यातच पक्षाला फटका बसण्याचा अंदाज आहे. शिवाय शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा विजय काँग्रेसच्या उमेदवारावरच अवलंबून आहे.

सध्या काँग्रेसचा उमेदवार समोर नसला तरी संभाव्य उमेदवार म्हणून मधुरीमाराजे छत्रपती यांना मानले जाते. कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे. येथे विजयी कोणाला करायचं यापेक्षा पाडायचे कोणाला हे ठरवलं जाणार आहे. त्यामुळे इथे उमेदवार कोण? यावर पुढील राजकरण वळण घेणार आहे.

भाजपचे नेते आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणुकीला सामोरे गेले होते. तर 2022 च्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपकडून संधी आजमावली होती. मात्र, दोन वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

तर महायुतीकडून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यानंतर महायुतीत निर्माण झालेली धुसफूस चव्हाट्यावर आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आपणच हक्कदार असल्याचे जाहीर केले आहे.

पोटनिवडणुकीतच ही जागा शिवसेना शिंदे गटाला देण्याचे आश्‍वासन भाजप नेत्यांनी दिल्याचे ते सांगतात. त्या अनुषंगाने त्यांनी देखील तयारी सुरू केली आहे. मात्र, भाजप कोणती भूमिका घेणार? यावरच त्यांची उमेदवारी आणि विजय ठरणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडे सध्याच्या घडीला उमेदवार नाही.

प्रचाराची पातळी सध्यातरी महाविकास आघाडीची थंड आहे. ऐनवेळी काँग्रेस उत्तर मध्ये कोणता चेहरा समोर आणणार हे केवळ आमदार सतेज पाटील यांनाच माहिती आहे. त्यांचे राजकीय गुपित डाव आजपर्यंत यशस्वी झाले आहेत. काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्रीताई जाधव यांनी देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची ठाम तयारी केली आहे.

पोटनिवडणुकीत ज्या पद्धतीने त्यांच्या मागे सहानुभूती होती. ते चित्र या विधानसभा निवडणुकीत नाही. त्यामुळे काँग्रेसने जवळपास उमेदवार बदलला आहे. उमेदवारीची माळ माजी आमदार मालोजी राजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरीमाराजे छत्रपती यांच्या गळ्यात पडू शकते. किंवा एनवेळी सरप्राईज उमेदवार पुढे आणला जाऊ शकतो.

कसबा बावडा मतदारसंघ हा आघाडीची जमेची बाजू आहे. तर आमदार सतेज पाटील यांचे देखील नाव उत्तर विधानसभा मतदारसंघातून चर्चेत आहे. मात्र ते उमेदवारी घेण्यास राजी होतील असे नाही. कारण राज्य स्तरावर त्यांचे नेतृत्व तयार होत असताना त्यांना अन्य मतदारसंघात ही प्रचारासाठी जावे लागणार आहे. शिवाय विधान परिषदेचा कालावधी अजून शिल्लक आहे.

शिवाय शिवसेना ठाकरे गटाकडून उपनेते संजय पवार, शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, विजय देवणे हे देखील इच्छुक आहेत. त्यातील एक गट ठाकरे गटाला उमेदवारी घेण्यासाठी ठाम आहे. जर उत्तरेत शिवसेना ठाकरे गटाला बळ नाही दिले तर दक्षिण आणि करवीरमध्ये शिवसेनेचा हिसका दाखवण्याची भाषा खाजगीत होत आहे.

त्यामुळे उत्तरच्या राजकारणात महायुती आणि महाविकास आघाडीमध्येच अंतर्गत कुरघोडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका दोन्हीही आघाडींना बसू शकतो असा राजकीय अंदाज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT