Dharmana Sadul, K. Chandrasekhar Rao News 
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी खासदार पक्ष सोडणार

K. Chandrasekhar Rao News : चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचा विस्तार देशभरात करण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur Congress News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी अखेर सोलापुरातील काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार धर्माण्णा सादूल‌‌‌ (Dharmana Sadul) यांना गळाला लावण्यात यश मिळवले आहे. सादुल हे उद्या (ता. २८ मार्च) सकाळी आपल्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भारत राष्ट्र विकास समितीमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

उद्या सकाळी 11 वाजता आपण काँग्रेस शहराध्यक्षांना आपला राजीनामा जड अंतःकरणाने सुपूर्द करणार असल्याचे सादूल यांनी सांगितले. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचा विस्तार देशभरात करण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. त्याची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रापासून केली असून त्यासाठी त्यांनी तेलंगणाशेजारील महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राव हे सोलापुरातील पण मूळचे तेलंगणाचे धर्माण्णा सादूल यांनी भारत राष्ट्र विकास समितीत यावे यासाठी विनंती करत होते. सुरुवातीला सादूल यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, राव यांच्या मंत्रिमंडळातील चंद्रशेखर रेड्डी यांनी सादुल यांच्याकडे सतत पाठपुरावा केला, त्यानंतर सादूल यांनी सहकाऱ्यांशी चर्चा करून अखेर भारत राष्ट्र विकास समिती जाण्याचा निर्णय आज जाहीर केला आहे. लवकरच ते आपल्या सहकाऱ्यांसह भारत राष्ट्र विकास समितीमध्ये प्रवेश करणार आहेत.

सादुल हे गेल्या 50 वर्षापासून काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. काँग्रेसमध्ये त्यांनी नगरसेवक, महापौर आणि खासदार म्हणून काम केले आहे. सोलापूर लोकसभेच्या 1989 च्या निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले, त्यानंतर दोन वर्षांनी १९९१ झालेल्या मध्यावधी निवडणुकीतही सादूल हे दुसऱ्यांदा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते.

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना केल्यानंतर सादूल यांनी काँग्रेससोडून पवारांसोबत जाणे पसंत केले होते. राष्ट्रवादीने त्यांना सोलापूर शहर उत्तरमधून विधानसभेची उमेदवारी दिली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते.

भारत राष्ट्र विकास समितीमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात धर्माण्णा सादूल म्हणाले की काँग्रेसने आपल्याला भरपूर काही दिले अगदी खासदारकीपर्यंत संधी दिली, त्याबद्दल माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा मी ऋणी आहे. काँग्रेस सोडण्याचे दुःख आहेच; परंतु काँग्रेसमध्ये आता जुन्या नेत्यांना निर्णय प्रक्रियेत कोणीही विचारात घेत नाही. गेल्या काही वर्षांत मलाही साईडला ठेवण्यात आले होते, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. असे असले तरी आपण मोठ्या जड अंतकरणाने काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याच वेळी त्यांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भारत राष्ट्र विकास समितीचे 10 नगरसेवक निवडून येतील, असा दावाही केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT