Sujay Vikhe
Sujay Vikhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आघाडी सरकारला सामान्यांचे घेणे-देणे नाही

संजय आ. काटे

श्रीगोंदे : महाविकास आघाडीतर्फे आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार महाविकास आघाडीने राज्यभर आंदोलनेही केली. त्यामुळे आज भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य करत टीका केली. या भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही महाविकास आघाडीवर जोरदार टीकेची झोड उठविली. The Mahavikas Aghadi government does not care about the common man

श्रीगोंदे शहरातील विविध विकासकामांचा प्रारंभ आज खासदार डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 60 वर्षांवरील नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत मोफत सहायक साधनांच्या वाटपासाठी तपासणी शिबिर झाले. या प्रसंगी आमदार बबनराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, केशवराव मगर, बाळासाहेब गिरमकर, संजय जामदार, संदीप नागवडे, बाळासाहेब महाडीक, अनिल ठवाळ, अनुजा गायकवाड, सुवर्णा पाचपुते, बापूसाहेब गोरे, सिद्धेश्वर देशमुख उपस्थित होते.

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, श्रीगोंद्यासह जिल्ह्यात रस्त्यांच्या कामांचा सपाटा लावला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातूनच सर्व कामे सुरू आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शेतकरी व सामान्यांचे काही घेणे-देणे नाही. विकासपुरुष अशी उपाधी लावलेले नेतेही भाजपच्या विकासकामांत येऊन नारळ वाढवीत असल्याने, केंद्राचे काम उत्तम सुरू असल्याचा दाखला मिळत आहे. या सगळ्यात राज्य सरकार कोणाचा विकास साधत आहे, असा सवाल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.

ते पुढे म्हणाले, की रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. कामाचा दर्जा चांगला हवा, ही पहिली अट आमची राहते. दर्जेदार कामे झाली तरच त्या निधीचा उपयोग होतो. श्रीगोंद्यासह जिल्ह्यात केंद्र सरकारचा मोठा निधी त्यासाठी खर्च होत आहे. निधीसाठी कोरोनाचे कारण केंद्राने पुढे केलेले नाही. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तेथे निधी देऊन कामे सुरू आहेत. मात्र, त्याच वेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा सामान्यांसाठीचा विकास कुठेही दिसत नाही.

उत्तर प्रदेशातील घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यातील सामान्यांना वेठीस धरण्याचा उद्योग झाला आहे. केंद्राचा निधी आला त्या रस्त्यांच्या कामाचा नारळ वाढविण्यासाठी विकासपुरुष उपस्थितीत राहतात. जिल्ह्यात आमचे काम उत्तम सुरू आहे, ते दिसतच आहे, असा टोला विखे यांनी लगावला.

निवडणुका लागण्याची वाट पाहतोय

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या संदर्भात डॉ. विखे म्हणाले, की मी तर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागण्याची वाट पाहतोय. प्रचारात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पर्दाफाश करू, असे सूचक विधानही त्यांनी या वेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT