कोयनानगर : अतिवृष्टीमुळे २२ जुलैला कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावात भुस्खलन होऊन घरे गाडली गेली होती. या गावातील जनता गेल्या दोन महिन्यांपासून दाटीवाटीने कोयनानगर येथील माध्यमिक व प्राथमिक शाळेत राहत आहे. या आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी शासनाने कोयनानगर येथील १५० मोडकळीस आलेल्या खोल्या दोन महिन्यात नवीन केल्या आहेत. आता या खोल्यात येत्या दोन दिवसांत येथील ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला आहे.
अतिवृष्टीमुळे कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावांत भूस्खलन होवुन आपत्तीचा डोंगर काळ बनुन गावांवर कोसळला होता. यामध्ये मिरगाव मधील ११, ढोकावळे येथील पाच तर हुंबरळी येथील एक अशी १७ घरे जमीनदोस्त झाली होती. यामुळे या तीन गावांचे अस्तित्व धोक्यात आले होते. या तीन गावांतील सर्व ग्रामस्थांना कोयनानगर, चाफेर मिरगाव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत तर हुंबरळी येथील लोकांना पर्यटन महामंडळ व खाजगी मालकाच्या रिसॉर्टमध्ये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
कोयना प्रकल्पाच्या शासकीय वसाहतीतील १५० मोडक्या खोल्या दुरूस्त करून त्या खोल्यांमध्ये आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याच्या गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेवरून राज्य शासनाने तातडीने मान्यता देवून मोडकळीस आलेल्या खोल्या तातडीने नव्या स्वरूपात उभारण्याचे काम युध्द पातळीवर सुरु होते. दोन महिन्यांच्या कालावधीत सगळ्यांना हेवा वाटेल अशा सर्व सोयींनीयुक्त टुमदार १५० खोल्या कोयनानगर येथे तयार झाल्या आहेत. तब्बल दोन महिन्यानंतर आपत्तीग्रस्त व सध्या कोयनानगर व चाफेर-मिरगांव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत राहणाऱ्या मिरगाव, ढोकावळे या गावातील आपत्तीग्रस्तांना येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
शासनाने या आपत्तीग्रस्त लोकांच्या तात्पुरत्या निवासस्थानाचा विषय निकाली काढला आहे. कोयनानगर येथील १५० वसाहती मधील खोल्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. दोन महिन्यात १५० खोल्या उभ्या राहिल्या आहेत. या खोल्यांमध्ये मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या आपत्तीग्रस्त गावातील बाधिताचे तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे.
मिरगाव येथील बाधित आपत्तीग्रस्त कोयनानगर येथील नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल या तर ढोकावळे येथील आपत्तीग्रस्त न्यु इंग्लिश स्कुल चाफेर, मिरगाव या विद्यालयात दोन महिन्यापासून वास्तव्यास आहेत. येत्या चार ऑक्टोबरपासुन दीड वर्षापासुन बंद असलेली सर्व विद्यालये सुरु होत आहेत. विद्यालय सुरु करण्यासाठी या विद्यालयात असणारे आपत्तीग्रस्त अन्यत्र स्थलांतरीत करणे गरजेचे आहे.
तात्पुरते निवासस्थान पूर्ण झाल्याने आपत्तीग्रस्तांचे या निवासस्थानी तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी शाळा मोकळ्या करून देण्यात येण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या तीन गावाच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. आपत्तीग्रस्त असणाऱ्या या तीन गावातील १०० बाधित लोकांना प्रथम प्राधान्याने या खोल्या दिल्या जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.