Manikrao Vidhate, Amit Khamkar, Sagar Gunjal, Joy Lokhande etc. while giving statement to Ahmednagar Municipal Commissioner
Manikrao Vidhate, Amit Khamkar, Sagar Gunjal, Joy Lokhande etc. while giving statement to Ahmednagar Municipal Commissioner Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर शहराच्या कचरा प्रश्नावर सत्ताधारी राष्ट्रवादी आक्रमक

अमित आवारी

अहमदनगर - अहमदनगर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. अहमदनगर शहर कचराकुंडी मुक्त झाले असले तरी आता पुन्हा शहरात कचऱ्याचे ढीग दिसत असल्याचा आरोप करत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेच महापालिकेला आंदोलनाचे अल्टिमेटम दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांनी शिष्टमंडळासह हे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले आहे. ( The ruling NCP is aggressive on the waste issue of Ahmednagar city )

निवेदन देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष वैभव ढाकणे, कामगार सेल अध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, अर्बन सेलचे प्रा.अरविंद शिंदे, युवक उपाध्यक्ष सागर गुंजाळ, सरचिटणीस गणेश बोरुडे, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष जॉय लोखंडे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हंटले आहे की, शहरात प्रतिदिन उचलल्या जाणाऱ्या कचऱ्या बाबत महापालिकेचा घनकचरा विभाग व एजन्सीच्या दिरंगाईमुळे शहरामध्ये मोठ-मोठे कचऱ्याचे ढीग निर्माण होत आहेत. महापालिका प्रशासनाच्या कचरा संकलन करणाऱ्या एजन्सीवर कोणत्याही प्रकारचा धाक उरला नसल्यामुळे शहराच्या चौकात, बाजारपेठामध्ये, रस्त्यांच्या दुतर्फा व रस्त्यांवर कचरा साचलेल्या अवस्थेत पहायला मिळत आहे. यामाध्यमातून कचऱ्याचे योग्य रितीने संकलन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे साचलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत तरी लवकरात-लवकर साचलेला कचरा उचलण्यात यावा अन्यथा महापालिकेत आंदोलन करू असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन केले नसल्याने कचऱ्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्य नष्ट झाले आहेच, याच बरोबर नागरिकांच्या आरोग्यविषयक गंभीर प्रश्न उद्भवू लागला आहे. त्यामुळे घनकचरा हा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर अशी समस्या बनू लागली आहे. हे प्रकार टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कचरा संकलनास गती देऊन उपाययोजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. तरी वरील बाबींचा आपण नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्यपूर्वक विचार करून महापालिका हद्दीतील कचरा संकलनास गती देऊन योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, येत्या तीन दिवसांत कचरा संकलनाचा प्रश्‍न मार्गी लावू अन्यथा एजन्सीवर दंडात्मक कारवाई करू.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT