Shambhuraj Desai, Satyajit Patankar
Shambhuraj Desai, Satyajit Patankar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan : दोनवेळा आस्मान दाखवलं, याचं भान ठेवा... शंभूराज देसाईंचा पाटणकरांना टोला

अरूण गुरव

मोरगिरी : आमच्यात हिम्मत असल्यानेच मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर तुम्हाला विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा मोठया फरकाने आस्मान दाखवले आहे. याचे भान सत्यजितसिंह यांनी ठेवावे. बालिश, निष्क्रीय तसेच जनतेने दोन वेळा नाकारलेल्या नेतृत्वाला राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकारी आहे का, असा सवाल राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

पाटणमध्ये सध्या राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर सक्रिय झाले असून त्यांनी मंत्री शंभूराज देसाईंवर टीकेची झोड उठवली होती. त्याला मंत्री देसाई यांनी परखड शब्दात प्रतिउत्तर दिले आहे. शंभूराज देसाई यांनी म्हटले की, काँग्रेसमधून बंडाळी करत बाहेर पडून वेगळया पक्षाची स्थापना केली. त्यावेळी पहिल्यांदा तुमच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे आपले पिताश्री यांनी नेमके काय केलं होतं याचेही उत्तर तुम्ही द्या.

तसेच उठाव आणि बंडाळी यातला फरकच कळत नसेल अशा बालिश, निष्क्रीय तसेच जनतेने दोन वेळा नाकारलेल्या नेतृत्वाला राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकारी आहे का. आता काहीच काम शिल्लक नसलेल्या मंडळी केवळ प्रसिध्दीसाठी मोठया आवेषात बेताल वक्तव्य करत आहेत. कार्यकर्ते टिकून रहावेत म्हणून त्यांची करमणूक करण्याचा हा प्रकार असल्याने मतदारसंघातील सर्व सामान्य जनता याकडे गांभीर्याने नक्कीच बघणार नाही.

कारण महाविकास आघाडीच्या काळामध्ये या निष्क्रिय नेतृत्वाने तालुक्यातील जनतेला माझे प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांची खोटी पत्रके काढून निव्वळ करमणूकीचा खेळ केला. त्यामुळे आपण केलेल्या करमणूकीमुळे आपल्या सोबत किती जनता आहे, हे येणाऱ्या काळातच कळेल. केवळ मोठया नेत्यांची नावे घ्यायची आणि त्यांचे नावे पत्रक काढून लोकांची दिशाभूल करायची हा प्रकार तालुक्यासाठी नवीन नाही.

अशा प्रकारे केलेला प्रयत्न तालुक्यातील सुज्ञ जनतेने त्यावेळी हाणून पाडला आहे, हे ही चांगलेच ज्ञात आहे. निवडणूक आली की वाडयाच्या बाहेर पडायच आणि जनतेमध्ये दिशाभूल करणे हा तुमचा एककल्ली कार्यक्रम आता तालुक्यातील जनतेला चांगलाच माहिती झाला आहे. मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. पाटण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील गावे व वाडया वस्त्यांच्या प्रलंबित विकास करण्याचा नेहमीच प्रयत्नशील असून गावां-गावांत विकासाची कामे सध्या सुरू आहेत.

विधानसभेच्या निवडणूकीत मतदारसंघातील आम जनतेने नेहमीच विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाला पाठबळ दिले आहे. निष्क्रीय असणाऱ्या नेतृत्वाला बाजूला करत सर्व सामान्य जनतेच्या आशिर्वादानेच आपला दोनदा मोठया फरकाने पराभव केला आहे. दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या व ग्रामपंचायतीच्या फंडातून पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या कामांचे भूमीपूजनासाठी जाण्याची आजपर्यत वेळ आली नसून मतदारसंघामध्ये मंजूर असलेल्या विकास कामांची भूमीपूजने ही विभागा-विभागातील गावा-गावातील माझे सामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी करत आहेत.

त्यामुळे मतदारसंघामध्ये विकासाची कामे सुरू आहेत की नाही हे झोपेच्या सोंगत असलेल्या व कावीळ झालेल्यांना दिसणारच नाहीत. परंतु सर्व सामान्य जनता मताच्या रुपाने नक्कीच याचे उत्तर येणाऱ्या काळात देईल. समोरा-समोर येण्याचे आव्हान देताना आपण ज्या आवेशात बोलत आहात किमान आपण आपली राजकीय उंची तपासून अशा प्रकारची वक्तव्ये करावीत. आपणच ठिकाण तारिख व वेळ सांगा जरूर समोरा समोर येऊन दूध का दूध व पाणी का पाणी केले जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT