सातारा : गेल्या काही दिवसांपासून शांत झालेला सातारच्या दोन राजांतील वादात आज आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आज ठिणगी टाकली. सातारा शहरासह हद्दवाढ झालेल्या भागातील स्वच्छतेच्या विषयावरुन त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीवर तोफ डागली. पालिकेवर प्रशासक असल्याने सत्ताधाऱ्यांनी याकडे दूर्लक्ष करायचे का, असा प्रश्न उपस्थित करुन जबाबदारी घेणार नसतील तर खासदारांच्या सातारा विकास आघाडीने पालिकेतून रिटायर्डमेंट घ्यावी, असा खोचक सल्ला दिला आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या सातारा पालिकेतील सातारा विकास आघाडीवर टीकेची झोड उठवली. शिवेंद्रसिंहाराजे म्हणाले, की गेली पाच वर्षे त्याची आघाडी सत्तेत होती. आता पालिकेवर प्रशासक आल्यावर त्यांचे नगराध्यक्ष व नगरसेवक कुठे गेले. प्रशासकआला की त्यांची सातारा शहराच्या प्रति असलेली जबाबदारी संपली का. पालिकेत गेल्या पाच वर्षात कोणी किती बिले काढली. कमिशनमधून किती मलिदा लाटला हे सगळ्यांना माहिती आहे.
सत्तेत असणारे सातारा विकास आघाडीचे नगरसेवक व नगराध्यक्षा कुठं गेलेत. आता त्यांचे नेते निवडणूक लागली की मते मागायला येणार आहेत. त्यानंतर त्यांची नाटक, नौटंकी, मिठ्या मारणे सुरु होणार आहे. त्यावेळी तुम्हाल मतांसाठी सातारकर पाहिजेत. शाहूनगर परिसरात स्वच्छता होत नाही. स्वच्छतेचे टेंडर कोणाला द्यायचे याचा वाद आहे. कोणत्या नगरसेवकाला टेंडर द्यायचे याचा त्यांच्यात वाद आहे. ठेकेदाराची नेमणूक होत नाही.
राज्य सरकारच्या योजनेतील कामाचे मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळाले नाही म्हणून काही दिवस काम पुढे ढकला ढकली करून अडवले. आता देसाईंना काम मिळाले आहे ते चांगले काम करत आहेत. कमिशनबाजीमुळे कामे पुढे ढकलणे, हेच त्यांचे काम असून सातार शहराचा त्यांना विचार नाही. स्वच्छता नाही, झाडे झुडपे वाढली आहेत. खासदार साहेब राहतात तसेच मी राहातो, या रस्त्याची काय अवस्था आहे, हे पहावे.
सातारा विकास आघाडीचे नगरसेवक त्यावेळी सत्तेत होते. आता प्रशासक असल्यावरही त्यांनी समस्या सोडवण्यासाठी आले पाहिजे. पालिका प्रशासनावर कोणीतरी लक्ष ठेवले पाहिजे. पाच वर्षे सतेत ही मंडळी होती आता सत्ता गेली की हात झटकून बसले आहेत. विविध कारणांनी पालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. प्रशासक आला आहे. पण सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांची जबाबदारी आहे. पण ते पुढे येत का नाहीत. त्यांना यायचे नसेल तर पुढच्यावेळी त्यांनी सत्तेत येऊ नये. रिटायर्डमेंट घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच खासदारांच्या सातारा विकास आघाडीने पालिकेच्या निवडणुकीतून व पालिकेतून रिटायर्डमंट घ्यावी, असा टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.