Nagar Political News : वारसा हक्क नोकरी मिळावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी सामूहिक रजा टाकून मंत्रालयावर लाँग मार्च सुरू केला आहे. यामुळे नगर शहरातील नागरी सेवा ठप्प झाल्या असून, नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या अनुषंगाने माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी या सर्व परिस्थितीस आयुक्त डॉ. पंकज जावळे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
महानगरपालिकेत प्रशासन प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या आयुक्तांवर शहराची तसेच मनपातील कर्मचाऱ्यांचीही मोठी जबाबदारी असते. यासाठी त्यांच्या दिमतीला मोठा अधिकारी वर्ग असतो. असे असताना नगरचे विद्यमान मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे आपले कर्तव्य पार पाडण्यात सर्वच आघाड्यांवर साफ अपयशी ठरले आहात, असा आरोप माजी महापौर कळमकर यांनी केला आहे. (Nagar News)
आयुक्तांना कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा विषय व्यवस्थित हाताळता आला नाही. लाड बर्वे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नोकरीचा लाभ मिळणेबाबत मनपा कर्मचारी युनियनने २९ ऑगस्ट २०२३ रोजचीच आयुक्त आणि महापौरांना पत्र दिले होते. सातव्या वेतन आयोगासंदर्भातील फाइल मुख्यमंत्री कार्यालयात आहे. तिथे संबंधित प्रस्तावात त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्या दूर करून योग्य प्रस्ताव पाठविण्याची अंतिम जबाबदारी आयुक्तांचीच होती. (Nagar News)
लोकशाही मार्गाने त्यांना आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याचा पूर्ण हक्क आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांवर थेट चारशे किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ फक्त आयुक्तांच्या हलगर्जीपणामुळे आली आहे हे तितकेच खरे आहे, असेही कळमकर यांनी म्हटलं आहे.
मनपा कर्मचारी युनियनने ऑगस्टमध्येच प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याकडे प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांनी तितक्या गांभीर्याने पाहिले नाही. शासन स्तरावर निर्णय प्रलंबित आहे असे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मधल्या काळात युनियनने लॉंग मार्चचा इशारा दिला. त्यानंतरही आयुक्तांनी केवळ बैठक घेतली. ठोस असे काहीच पदरात पडत नसल्याचे दिसून आल्यावर मनपा कर्मचाऱ्यांनी थेट मुंबईलाच जाऊन न्याय मिळविण्याचे ठरवले आहे.
सफाई कर्मचारी नसल्याने संपूर्ण शहरात कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. 2 ऑक्टोबरला अधिकाऱ्यांनी गाजावाजा, फोटोसेशन करीत स्वच्छता अभियान सुरू केले. त्याच दिवशी कर्मचारी मोर्चाने मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे अधिकारी कोणाच्या जिवावर स्वच्छता अभियान यशस्वी करणार हा प्रश्नच आहे. निर्णय न घेता केवळ खुर्चीला चिकटून बसण्याचे काम अधिकारी करीत असतील, तर शहराचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत.
पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता...
-अहमदनगर महानगरपालिकेचे हजारो कर्मचारी मोर्चाने मुंबईकडे रवाना झाले असल्याने महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगितले जाते. अशा वेळी नगरच्या पालकमंत्र्यांनी या प्रश्नात विशेष लक्ष घालणे आवश्यक आहे. मनपा आयुक्तांना वेळीच आवश्यक त्या सूचना देऊन कर्मचाऱ्यांची नगर ते मुंबई पायपीट थांबविण्यासाठी पालकमंत्र्यांनी स्वतः पुढे येऊन प्रयत्न करायला हवा होता, असे कळमकर यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.