-यशवंत बेंद्रे
Satara News : तारळी धरणावर कळंबे येथे होऊ घातलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्टला तारळे विभागातील 102 गावांनी आपला कडाडून विरोध कायम ठेवला आहे. हा प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीत होवू न देण्यासाठी 102 गावातील नागरिकांनी एकत्रित येत या प्रकल्पाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र स्थानिक लोकांचा विरोध डावलून कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
तारळे परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सदर काम तातडीने थांबवावे, अशी मागणी तारळी अदानी प्रकल्प विरोधी कृती समितीने(Adani Green Energy Project) जिल्हाधिकारी सातारा यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन कृती समिती सदस्यांनी जिल्हाधिकारी सातारा, पाटण तालुका उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, तहसीलदार अनंत गुरव, उंब्रज पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवदेनात म्हटले आहे, 'तारळी धरणावर उभारण्यात येत असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट या वीजनिर्मिती प्रकल्पाला संपूर्ण तारळे विभागातून आमचा विरोध आहे. विभागातील तब्बल गावांनी तसे ठरावही केले आहेत. 12 मार्च 2024 रोजी तारळे विभागातील कळंबे येथे एमपीसीबी आणि प्रशासनाच्यावतीने यासंदर्भात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्या अनुषंगाने एमपीएससी सातारा यांना साधारण एक हजारपेक्षा जास्त हरकती दाखल झाल्या होत्या.'
तसेच 'सुनावणीच्या दिवशी आणि नंतर अशा अनेक हरकती मिळाल्या आहेत. यावेळी प्रत्यक्ष सुनावणीला तारळे विभागातील शेकडो नागरीक उपस्थित होते. याशिवाय अनेक पर्यावरणवादी संघटना व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनीही या विनाशकारी प्रकल्पाला मोठा प्रखर विरोध दर्शविला आहे.'
'सध्या हा विषय केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे. असे असतानाही अदानी कंपनीकडून या प्रकल्पाच्या जागेवर अनधिकृतपणे टेस्टींग आणि खोदकाम चालू केले आहे. या परिसरातील आणि आजूबाजूच्या सर्वच गावातील व विभागातील एकूण 102 गावांचा या विनाशकारी प्रकल्पाला कडाकडून विरोध आहे. त्यामुळे वरील विषयाची योग्य ती दखल घेवून तारळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी. यासाठी तारळी पंप स्टोरेज हायड्रो प्रोजेक्टवर अदानी कंपनीने सुरू केलेले काम त्वरीत थांबवावे.
स्थानिक लोकांच्या भावना तीव्र आहेत, म्हणून प्रशासनाकडून सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय याठिकाणी कोणतेही काम करू नये. सध्या सुरू असलेले काम तातडीने थांबवावे.', असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी देवराज पाटील, बाळासाहेब सपकाळ, अभिजित जाधव, इंद्रजित पाटील, जोतिराम जाधव, हंबीरराव गोडसे, काशिनाथ भंडारे, नानासाहेब पन्हाळकर, बाळासाहेब जाधव, गणेश जाधव, भास्करराव गोरे, सचिन लवंगे, सदाशिव सपकाळ, सुरज गोरे, मारूती पवार, विजय यादव, अनिल कांबळे, गणेश जाधव, विश्वनाथ पवार, महिपतराव जाधव आदींसह तारळे खोऱ्यातील गावातील कृती समितीतील पदाधिकारी उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.