Baba Mistri
Baba Mistri Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur politics : ...तर बाबा मिस्त्री ठरले असते सोलापुरातील रवींद्र धंगेकर!

प्रमोद बोडके

सोलापूर : कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी जी कमाल केली, तशीच कमाल विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत सोलापूर (Solapur) दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बाबा मिस्त्री यांनीही केली असती. त्या निवडणुकीत शिंदेंनी दक्षिणमध्ये अधिकचे लक्ष घातले असते तर मिस्त्री हेच सोलापुरातील धंगेकर ठरले असते, असा दावा काँग्रेसजन आजही ठामपणे करतात. (... then Baba Mistri would have been Ravindra Dhangekar from Solapur)

पुण्यातील पोटनिवडणुकीतून मतदारसंघ म्हणून कसबा आणि उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर चर्चेत आले आहेत. पुण्याप्रमाणे अनेक कसबा आणि धंगेकर सोलापूर जिल्ह्यातही दडले आहेत. जो भाग अमुक व्यक्तीचा व जातीचा बालेकिल्ला. तो भाग म्हणजे त्याचा ही तयार झालेली मोनोपल्ली म्हणजेच कसबा.

राजकारणात यशस्वी होण्यासाठी सत्तेतील पक्ष, जात, पैसा, राजकीय पार्श्वभूमी नसतानाही व वारंवार आलेले अपयश पचवून जिंकण्याची जिद्द आणि दिवसातील २४ तास व आठवड्यातील सात दिवस सामान्यांसाठी उपलब्ध असलेला कार्यकर्ता म्हणजे धंगेकर. आगामी निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील, असे अनेक कसबा उद्ध्वस्त करणे सोपे आहे, त्यासाठी फक्त त्या भागातील धंगेकर वेळीच ओळखून त्यांना योग्य संधी देण्याची आवश्‍यकता आहे.

सोलापुरातील शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असलेले तत्कालीन काँग्रेस नगरसेवक बाबा मिस्त्री यांना २०१९ मध्ये तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात काँग्रेसने सोलापूर दक्षिणमधून बाबा मिस्त्री यांना मैदानात उतरविले होते. त्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांना ८७ हजार २२३ मते मिळाली होती, ते २९ हजार २४७ मताधिक्क्यांनी विजयी झाले. परंतु ऐनवेळी काँग्रेसतर्फे लढत देणारे बाबा मिस्त्री यांना या मतदारसंघातून ५७ हजार ९७६ मते मिळाली. त्यावेळी माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी थोडे अधिक लक्ष दिले असते व ‘हात’ मोकळा सोडला असता तर कसब्यापूर्वीच सोलापूर दक्षिणमधून मिस्त्री हे धंगेकर ठरले असते, अशी खात्री आजही अनेकजण बाळगतात.

कसबा काबीज करण्यासाठी धंगेकर यांच्याकडे काहीच नव्हते. कसब्यात ज्या ब्राह्मण, मुस्लिम, मराठा जातीचे प्राबल्य आहे, ती जातही धंगेकर यांच्याकडे नव्हती. कसब्यात नगण्य असलेल्या लोणारी समाजातून येणाऱ्या धंगेकर यांनी सर्व समीकरणे खोटी ठरवत बाजी मारली आहे. निवडणुकांशिवाय जनतेमध्ये एकरूप झालेल्या या उमेदवाराला विजयी करून कसब्याच्या मतदारांनी ‘हू इज धंगेकर’चे चोख उत्तर दिले आहे.

पक्षापेक्षा धंगेकर जवळचे आहेत, असे जवळपास पन्नास मनसैनिकांनी त्यांच्या पक्षप्रमुखांना ठणकावून सांगितले. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाही ‘हु इज धंगेकर’ या प्रश्‍नाचे उत्तर नक्कीच समजले असणार. राजकारणात यशस्वी होण्यासाठी जात, पैसा आणि सत्ताधारी पक्ष लागतो, यामुळे नाउमेद होत असलेल्या अनेक युवा कार्यकर्त्यांना धंगेकर यांच्या माध्यमातून राजकारणात टिकून राहण्यासाठी नवसंजीवनी मिळाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात शहर उत्तर, शहर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, सांगोला हे विधानसभा मतदार संघ देखील सोलापूर जिल्ह्यातील ठराविक समूहाचे कसबाच आहेत. तसेच माढा, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा, माळशिरस या विधानसभा मतदार संघातील काही टापू नेत्यांनी प्रभावित असल्याने ते देखील मिनी कसबा म्हणून ओळखले जातात.

हे मतदार कसबा व मिनी कसबामध्ये देखील धंगेकर आहेत. त्यातील काही जण राजकारण्यांना लाखोली वाहत नाउमेद झाले, तर ज्यांनी धाडस केले ते झेडपी, पंचायत समिती आणि महापालिकेच्या पुढे जाऊ शकले नाहीत. प्रस्थापितांना वगळून जनाधार असलेल्या सामान्य व्यक्तीला संधी देण्यासाठी राष्ट्रवादीने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे दिसते. परिसराच्या विकास कामांपेक्षा तुम्ही आमच्यासाठी किती वेळ देता? ही मतदारांची बदललेली अपेक्षा पाहता आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातूनही नवे धंगेकर जन्माला येण्याची शक्यता आहे.

संग्राम थोपटेंच्या पडद्याआडून हालचाली

नाशिक पदवीधरच्या उमेदवारीवरून वादात अडकलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना रवींद्र धंगेकर यांच्या माध्यमातून जीवदानच मिळाले म्हणावे लागेल. कसब्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे जावई भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी प्रभावी कामगिरी केली. धंगेकर यांच्या विजयात आमदार थोपटे यांची फारशी चर्चा नाही. परंतु अनेक गोष्टींची जुळवाजुळव त्यांनी केली.

कधी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात संभाव्य मंत्री म्हणून तर कधी महाविकासच्या सरकारमधील विधानसभा अध्यक्षाच्या रिक्त जागेवर संभाव्य अध्यक्ष म्हणून आमदार थोपटे यांची चर्चा होती. चर्चा असूनही त्यांना संधी मिळाली नाही. तरीही नाउमेद न होता आमदार थोपटे यांनी कसब्याच्या निवडणुकीत पडद्याआड राहून केलेली कामगिरी दखलपात्र मानली जात आहे.

बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे चित्र बदलेले

काँग्रेसने जसे सर्वसामान्य धंगेकर यांना संधी देत आमदार केले. तशीच संधी पूर्वी शिवसेनेत (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात अनेकांना मिळत होती. त्यामुळे महाराष्ट्रात १९९० ते १९९९ या काळात अनेक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आमदार व खासदार झाल्या. शिवसेनेतेही २००४ नंतर ऐनवेळी ए. बी. फॉर्म बदलण्याचे प्रकार सर्रास घडू लागले.

शिवसेनेत उमेदवारी कशी बदलली जाते

शिवसेनेत उमेदवारी कशी चुटकीसरशी बदलली जाते? याचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील मंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार नारायण पाटील, नागनाथ क्षीरसागर, मनोज शेजवाल, माजी महापौर महेश कोठे यांच्यासह अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे अनेकांना या खेळीचा बळी व्हावे लागले. त्यावेळी शिवसेनेला निष्ठावंत आणि इलेक्टिव्ह मेरिटची फारशी किंमत नसल्याचे त्यावेळच्या उमेदवारीवरून व त्या उमेदवारांना पडलेल्या मतांवरून दिसते.

शिंदे समोरचे आव्हान

आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आगामी काळात निष्ठावंतांना नक्कीच अच्छे दिन येण्याची अपेक्षा आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. जुन्या शिवसेनेतील जुन्या पद्धती बंद करून जनाधार असलेल्या व्यक्तींनाच आगामी निवडणुकांमध्ये संधी देण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT