MLA Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics : उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही 'एमआयडीसी'बाबत बैठक नाही; कर्जत-जामखेडकर नागरीक आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : कर्जत-जामखेड एमआयडीसी मंजुरीचा प्रश्न एकीकडे पावसाळी अधिवेशनात गाजत असताना दुसरीकडे मतदारसंघात राजकीय दृष्टीने संवेदनशील बनत चालला आहे. 'तुझ्याकडे बघतोच' अशी धमकी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदेंना (Ram Shinde) उद्देशून केल्याचा आरोप करत मंगळवारी (25 जुलै) कर्जत आणि जामखेड इथे भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.

याला उत्तर म्हणून की काय उद्या गुरुवारी (२७ जुलै) कर्जत आणि जामखेड तालुक्यातील विविध ठिकाणी रोहित पवार यांचे कार्यकर्ते एमआयडीसी मंजुरीच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाटेगाव-खंडाळा येथील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. केवळ सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या 'एमआयडीसी'बाबतचा मुद्दा सध्या श्रेयवादावरून पेटला आहे. रोहित पवार यांनी वेळोवेळी उद्योग मंत्र्यांच्या भेटी घेऊन हा विषय मार्गी लावण्याबाबत विनंती केल्याचे तसेच अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला असल्याचे सांगितले आहे.

तर भाजप (BJP) नेते राम शिंदे यांनीही आपण फार पूर्वीपासून या मागणीचा पाठपुरावा करत आलो, असल्याचे सांगितले. विधिमंडळ अधिवेशनात वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरही सरकारकडून केवळ मंजुरीच्या आश्वासन मिळत असल्याने कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही, असा आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधिमंडळ परिसरात आंदोलन करत केला होता. दरम्यान, आंदोलनाला बसलेल्या रोहित पवार यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली होती. तात्काळ स्वरूपात बैठक लावून याबाबत चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, दिलेले आश्वासन उद्योगमंत्र्यांनी न पाळल्याने पवार सरकारवर चांगलेच संतापले.

या सर्व घडामोडींवरून कर्जत-जामखेड मतदारसंघातील पवार समर्थक, कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विविध ठिकाणी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. राशीन सकाळी ९ वाजता करमाळा चौकत, माही जळगाव चौक येथे सकाळी ८ : ३० वाजता, क्रांतीचौक, मिरजगाव इथे ८ : ३० वाजता, खर्डाचौक, जामखेड इथे सकाळी ११ वाजता, छत्रपती चौक कर्जत इथे सकाळी १० वाजता युवकांनी रास्तारोकोत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT