Jayant Patil, Suresh Khade sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सुरेश खाडेंना जयंत पाटलांचा हिशोब चुकता करण्याची संधी!

पुढील काळात सुरेश खाडे (Suresh Khade) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे

सरकारनामा ब्यूरो

Suresh Khade : सांगली : महापालिका निवडणुकीला सुमारे वर्षाचा कालावधी बाकी असताना भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे (Suresh Khade) यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. याचा भाजपला (BJP) महापालिकेची सत्ता पुन्हा मिळवून देण्यासाठी फायदा होऊ शकतो. मात्र, सत्तेच्या खेळात तिन्ही शहरांच्या विकासाचाच खेळखंडोबा झाला आहे. त्यावर खाडे कोणती जादू करतात यावर हे अवलंबून असणार आहे. तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महापालिकेत केलेल्या खेळीचा हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली, असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज्यात सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर महिन्याभराने मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यात मिरजेतून सलग तीन वेळा विजयी झालेले आमदार सुरेश खाडे यांचा भाजपने मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांना युती सरकारच्या अखेरच्या टप्प्यात तीन-साडेतीन महिन्यांसाठी कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. त्यावेळी त्यांच्यावर सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, कामाची चुणूक दाखवण्याची संधी त्यांना मिळाली नाही. ती भरपाई करण्याची संधी पुन्हा त्यांच्याकडे आली आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आली होती. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जयंत पाटील यांनी महापालिकेतील भाजपचे सदस्य फोडून सत्ता उलटवली होती. त्याचे शल्य भाजपला आहे. शिवाय भाजपने आणलेल्या आयुक्तांनी सत्तांतर होताच भाजपलाच कात्रजचा घाट दाखवला होता. त्याची सलही भाजपच्या नगरसेवकांना आहे. या सगळ्याची परतफेड करण्याची संधी खाडेंना चालून आली आहे. नव्या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यातच सांगलीला संधी मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

सुरेश खाडे यांच्याकडून त्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांचे ओझे, विकास कामांचे आव्हान खाडे कसे पेलतात याची उत्सुकता आहे. जास्त निधी मिळविण्याचे आव्हान ही त्यांच्यासमोर असणार आहे. खाडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यामुळे महापालिका क्षेत्राला त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र, महापालिकेची सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे हा फायदा भाजपला होण्यासाठी त्यांचे लक्ष असेल. कारण महापालिकेची निवडणूक वर्षभरावरच येवून ठेपली आहे. महापालिका क्षेत्रातील रखडलेली कामे करण्यासाठी शेवटच्या वर्षात जास्तीत जास्त निधी मिळण्याचे आव्हान खाडेंसमोर असणार आहे.

युती सरकारच्या काळात महापालिकेची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री फडणवीस यांनी शंभर कोटींचा निधी जाहीर केला होता. त्यातून रस्त्यांची कामे झाली. मात्र, अद्याप बरीच कामे झाली नाहीत. काही कामे अजून सुरू झाली नाही. ती मार्गी लावावी लागणार आहेत. विशेष करून सांगलीतील भाजी मंडई, मिरजेतील लक्ष्मी मार्केट अशी इमारत बांधकामाची किंवा पुनरुज्जीवनाची कामे रखडली आहेत. खाडे हे काम तडीस नेतील आणि भाजपला पुन्हा महापालिकेत सत्ता मिळवून देण्यात ते यशस्वी होतील का याकडे लक्ष लागले आहे.

पुढील वर्षाच्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपला महापालिका क्षेत्रात विकास कामे करण्याची संधी आहे. ती मंत्री म्हणून खाडे कितपत साधून घेतात ते पाहावे लागणार आहे. याबरोबरच पालकमंत्री म्हणूनही त्यांनाच संधी मिळणार हे उघड आहे. जिल्ह्याबाहेरील पालकमंत्र्याबद्दल भाजपमध्येच नाराजी होती. हे लक्षात घेऊन खाडे यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाईल असे दिसते. याचा फायदा जिल्हा परिषदेसह नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT