पुणे : खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे हे दोघे फारसे एकत्रित फिरत नाहीत. काही बैठका असतील तरच ते एकत्र येतात. ते कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत एकत्र आले आणि साहजिकच त्याची चर्चा झाली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 (NH-4) वरील सातारा ते कागल नवीन सहा पदरीकरणच्या अनुषंगाने कोल्हापूरात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने (NHAI) बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार व इतर नेत्यांची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फार कमीवेळा एकत्र दिसणारे संभाजी राजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) आणि छत्रपती उद्यनराजे भोसलेही (Chhatrapati Udayanraje Bhonsle) बैठकीला उपस्थित होते व शेजारी बसले होते. यावेळी दोन्ही राजेंनी इतर लोकप्रतिनिधीं बरोबर काही मागण्याही केल्या.
उदयनराजे यांनी केलेल्या मागण्यांमध्ये रस्त्याचे आयुर्मान वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर करून रस्त्याचे काम करावे, प्रस्तावित लांबीत जास्तीत - जास्त ठिकाणी काँक्रिटीकरण करावे, रस्ते सुरक्षितता उपाययोजना कराव्या, रस्त्याच्या दोन्ही बाजूस दोन पदरी सर्व्हिस रोड करण्यात यावेत, कराड, काशीळ, नागठाणे, आदी महत्वाच्या ठिकाणी अंडरपास देण्यात यावेत. जंक्शन सुशोभीकरण करण्यात यावे, कराड शहराचा विस्तार बघता नव्याने रिंगरोड करण्यात यावा, भंडार पास मधील पाण्याचा निचरा योग्य होण्याच्या दृष्टीने डिझाईन करण्यात यावे, यांचा समावेश आहे.
तसेच, कराड व सातारा शहरांजवळील रस्त्याच्या लांबीत अत्याधुनिक पद्धतीचे हाय मास्ट दिवे व ऐतिहासिक शहराला असलेने पथदिव्यांच्या डिझाईन पुरातन स्टाईलमध्ये कराव्या, टोल प्लाझाचे डिझाईन अत्याधुनिक पद्धतीची असावे, वाहने विना अडथळा पास होण्याच्या दृष्टीने प्लाझाची संख्या निश्चित करण्यात यावी, प्रत्येक २० किलोमीटरवर बसथांबा ट्रक हर्मिनस व महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह करण्यात यावे. याबरोबरच, मोठ्या नद्यांवरील पुलांच्या उंचीचा विचार करताना उच्चतम पुराच्या पाण्याच्या पातळीचा अभ्यास करण्यात यावा व आपत्ती परिस्थितीतही वाहतूक सुरळीत सुरू राहील, पुलांचे बांधकाम कमानी पद्धतीचे व आयुर्मान जास्त राहील अश्या प्रकारे नदी व ओढ्यावर करण्यात यावे अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
संभाजीराजे म्हणाले की महामार्गाचा बराचसा भाग नदी व पूरप्रवण भागांतून जात असल्याने या महामार्गामुळे पूराचे पाणी निचरा होण्यात अडचणी येऊ नयेत, अशापद्धतीने याची बांधणी असावी. ज्याठिकाणी पूल बांधण्यात येणार आहेत, अशा ठिकाणी पाण्याचा प्रवाह तुंबणार नाही यादृष्टीने भराव न टाकता, कॉलम्स उभारून पूलांची बांधणी करण्यात यावी. ज्याठिकाणी भराव टाकणे आवश्यकच आहे, अशा ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप्स् टाकण्यात यावेत. कोणत्याही परिस्थितीत महापूरामुळे वाहतूक ठप्प होऊ नये तसेच, महामार्गामुळे पूराचे पाणी ओसरण्यास विलंब लागू नये, या दोन्ही बाबींची काळजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेणे गरजेचे असल्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
तसेच, रत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी वाठार ते बोरपाडळे असा योग्य पर्याय असताना देखील शिये ते पडवळवाडी भागातील पूरबाधीत क्षेत्रातून चुकीच्या पद्धतीने केलेले रेखांकन याबाबत त्यांनी विरोध व्यक्त केला.
या बाबत लोकप्रतिनिधी, संबंधित ग्रामस्थ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. तावडे हॉटेलनजीक पंचगंगा नदीवर असणारा जुन्या ऐतिहासिक शाहूकालीन पूलाचे अस्तित्व तसेच ठेऊन, नवीन पूल उभारण्याबाबत विचार व्हावा, अशी सूचना केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.