Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar News
Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar News Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

'ज्यांच्याजवळ सचिन वाझे होते, त्यांना वाजविल्याशिवाय राहणार नाही'

अमित आवारी

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या दृष्टीने आज भाजपची माऊली सभागृहात बैठक झाली. या प्रसंगी राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती वरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. (Ahmednagar News Updates)

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी स्वतःच्या कर्मामुळे सत्तेतून पायउतार होणार आहे. विधानपरिषद व राज्यसभेच्या निवडणुकीतील विजयामुळे भाजप नेते व कार्यकर्त्यांना नवी उमेद मिळाली आहे. राम शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा समर्थपणे संभाळला. त्याची ही पावती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. श्रद्धा व सबुरीने काम केले तर यश कोणीही थांबवू शकत नाही. सबुरीचे फळ शिंदेंना मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.(Radhakrishna Vikhe Patil News)

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने दोन-अडीच वर्षे अधिवेशने टाळली. अधिवेशन आले की कोविड रुग्णांचे आकडे वाढायचे. कोविडचे संकट भ्रष्टाचार करताना का नव्हते. या कालावधीत जनतेचे प्रश्न मांडण्याचे काम भाजपने केले. महाराष्ट्रातील जनतेला भाजप सर्वसामान्यांचा पक्ष वाटतो. अहमदनगर जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. एकाही मंत्र्याने कोविड सेंटर काढले नाही. अमरधाममध्ये प्रेतांच्या रांगा लागल्या, जिल्हा रुग्णालयाला आग लागली, रुग्णांना ऑक्सिजन नव्हते. त्यावेळी भाजपने जनतेला आधार दिला. मुख्यमंत्री मात्र फेसबुकवर होते. आमचे कुटुंब आमची जबाबदारी असे असेल तर कसे चालणार, अशी टीकाही त्यांनी केली.

महाविकास आघाडीच्या काळात कोणी टेंडर घ्यायला तयार नव्हते. महाविकास आघाडीने कोविडच्या काळात देण्यासाठी लिहिलेला 6 हजार कोटीचा धनादेश कुठे आहे. कोविड संकटकाळात सर्व काही केंद्र सरकारने द्याचे. शेतकऱ्यांना अनुदानही केंद्र सरकारने द्याचे मग राज्यातील सरकार काय करत होते. महाविकास आघाडीने एकच चांगले काम केले ते म्हणजे वसुलीचे. राज्यात आता आपले सरकार येणार आहे. ज्यांच्याजवळ सचिन वाझे होते. त्यांना वाजविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ देशाचे पंतप्रधान नाही. त्यांना विश्वनेता म्हणून पाहिले जात आहे. कोविड संकटकाळात केंद्र सरकारने धान्य दिले. या धान्य वाटप केंद्रांवर राज्यातील मंत्र्यांचे फोटो लावण्यात आले. लसीकरणाचा सर्व खर्च केंद्र सरकारने केला मात्र फोटो राज्यातील मंत्र्यांचे लावण्यात आले. भाजप नेत्यांचे फोटो का लावण्यात आले नाहीत, असा प्रश्न यांनी उपस्थित केला.

भुतांची नव्हे बुथ कार्यकर्त्यांची गरज

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका पाच महिन्यांत होणार आहेत. भाजपच्या बुथ कमिट्या केल्या ते लोक सापडत नाहीत. पक्षाची फसवणूक करू नका. आपल्याला भुतांची नव्हे, बुथ कार्यकर्त्यांची गरज आहे. याद्या भरून पूर्तता करू नका. जिल्हा परिषदेत सत्ता आणायची आहे, असे त्यांनी सांगितले.

पापाचा घडा भरून वाहतोय...

शिवसेनेच्या दोन गटांत काय चालले आहे, आम्हाला माहिती नाही. परिस्थितीवर फडणवीस लक्ष ठेऊन आहेत. पाच महिन्यांत निवडणुका आहेत. भुमिका घ्यावी लागेल. संघटनेत शोभेची पदे नको. ज्यांना पक्षाच्या कामासाठी वेळ नाही अशांच्या जागी नवीन लोकांना संधी द्या. नवीन पद्धतीने पक्ष बांधणी करावी. राज्य सरकारच्या पापाचा घडा भरून वाहत आहे, अशी टीका त्यांनी केली.

विठ्ठलाची पूजा फडणवीसच करणार

राज्यात वाट्यावरून भांडणे सुरू आहेत. आठवड्याभरात 800 शासन आदेश निघाले. त्यांचे दिवस भरले आहेत. पंढरपुरातील विठ्ठलाची पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पोटभरू कार्यकर्त्यांचे दिवस भरले

आम्हा भाजपच्या नेत्यांत वाद नाही. कार्यकर्त्यांनी आमची चिंता करू नये. आम्ही सर्व एक आहोत. पोटभरू कार्यकर्त्यांनी चिंता करू नये. त्यांचेही महाविकास आघाडी प्रमाणे दिवस भरले आहेत, असा इशाराही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT