Umesh Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

उमेश पाटलांनी जिंकली पहिली लढाई; ‘ती’ तीन गावे झेडपी गटातून वगळली!

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीपूर्वी उमेश पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर मिळविलेला हा विजय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : सोलापूर (solapur) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेतील पहिली लढाई जिंकली आहे. प्रारूप प्रभाग रचनेत पाटील यांचा गट असलेल्या मोहोळ तालुक्यातील नरखेड जिल्हा परिषद गटात समाविष्ट केलेली गलंदवाडी, पासलेवाडी, कोळेगाव ही माजी आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व असलेली तीन गावे अंतिम प्रभाग रचनेत वगळण्यात आली आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीपूर्वी उमेश पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर मिळविलेला हा विजय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. (Three villages were excluded from Umesh Patil's Narkhed Zilla Parishad group)

सोलापूर जिल्ह्यातील ७७ जिल्हा परिषद गट व १५४ पंचायत समिती गणासाठी आज (ता. २७ जून) जिल्हा प्रशासनाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नगरपंचायत स्थापन झाल्याने अनगर जिल्हा परिषद गटातील उर्वरित गावांचा समावेश पोखरापूर जिल्हा परिषद गटात झाला आहे. जुन्या अनगर जिल्हा परिषद गटातील गलंददवाडी/पासलेवाडी ही गावे नरखेड जिल्हा परिषद गटाला जोडली होती. कोळेगावचादेखील नरखेड जिल्हा परिषद गटात समावेश झाला होता.

प्रारूप प्रभाग रचनेतील या बदलावर कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी हरकत घेत जिल्हा परिषद गट प्रभाग रचनेत नैसर्गिक खुणांना प्राधान्य देण्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रभाग रचनेसाठी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचाही मुद्दा उपस्थित करत त्यांच्यातील प्रशासकीय कौशल्य दाखवून दिले. उमेश पाटील यांनी या मुद्यांच्या माध्यमातून घेतलेल्या हरकतीची दखल विभागीय आयुक्त सौरभ राव व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतली आहे. नरखेड जिल्हा परिषद गटातून आता गलंदवाडी, पासलेवाडी ही गावे वगळून या गावांचा समावेश आता पोखरापूर जिल्हा परिषद गटात झाला आहे.

नरखेड जिल्हा परिषद गटात समाविष्ट केलेल्या कोळेगावही वगळण्यात आले असून या गावाचा समावेश आता कामती जिल्हा परिषद गटात करण्यात आला आहे. कामती जिल्हा परिषद गटातील शिरापूर सो. हे गाव नरखेड जिल्हा परिषद गटात समावेश झाले आहे. नरखेड जिल्हा परिषद गटात आता नरखेड आणि शिरापुर सो असे दोन पंचायत समिती गण असणार आहेत. नरखेड जिल्हा परिषद गटासह मोहोळ तालुक्यातील इतर जिल्हा परिषद गटांच्या बाबतीत शिवसेनेचे युवा नेते सोमेश क्षीरसागर, अशोक भोसले यांनी देखील हरकत दाखल केली होती.

यापूर्वी मोहळ नगर परिषदेच्या प्रारुप प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी यासंदर्भातील तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मोहोळ नगर परिषदेच्या प्रभाग रचनेबाबतही उमेश पाटील यांनी रमेश बारसकर यांना साथ देत अंतिम प्रभाग रचचनेत आवश्यक ते बदल करण्यासाठी योग्य मुद्दे उपस्थित केले होते. त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेत मोहोळ नगर परिषदेच्या प्रभाग रचनेसाठी दाखल केलेल्या हरकती प्रशासनाने स्वीकारल्या होत्या.

मोहोळ तालुक्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राजन पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्यात संघर्ष बघायला मिळत आहे. आगामी निवडणुकांमध्ये हा संघर्ष अधिकृत तीव्र होण्याची शक्यता आहे. या संघर्ष पूर्वी झालेल्या प्रभाग रचनेच्या प्रशासकीय लढाईत उमेश पाटील यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT