Solapur, 23 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोसायटी मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील तीन मातब्बर उमेदवार आमनेसामने आल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मोहिते-पाटील गटाचे अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील, भाजपचे शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख आणि आमदार उत्तमराव जानकर यांचे निकटवर्तीय ज्ञानराज ऊर्फ माऊली पाटील यांच्यात ही चुरशीची तिरंगी लढत होत आहे.
शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख हे मोहिते पाटील यांवे एकेकाळी कट्टर समर्थक राहिलेले आहेत. त्यांनी मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद आणि श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच, मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर हे मोहिते पाटील यांचे सहकारी होते, दोघांनी एकमेकांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काम केले आहे, त्यांचे कट्टर समर्थक ज्ञानराज ऊर्फ माऊली पाटील अर्जूनसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर एकेकाळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, नामदेवराव जगताप, वि. गु. शिवदरे, ब्रह्मदेवदादा माने, गणपतराव देशमुख आणि सुधाकरपंत परिचारक यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचे वर्चस्व होते. मात्र, कालांतराने राज्यासह सोलापूर जिल्ह्यातीलही राजकीय समीकरणे बदलली. आता तब्बल आठ वर्षांनंतर संचालक मंडळाच्या निवडणुका होत आहेत.
या निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील बदललेली राजकीय समीकरणे विशेष लक्षवेधी ठरत आहेत. मोहिते पाटील यांचे एकेकाळचे खंदे समर्थक शहाजीराव ऊर्फ बाबाराजे देशमुख यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद आणि सदाशिवनगर येथील श्री शंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद अनेक वर्षे भूषवले.
प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या निधनानंतर कारखान्याचे नेतृत्व रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे आले. त्यानंतर देशमुख यांना केवळ संचालकपदावरच समाधान मानावे लागले. या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबाने माजी आमदार राम सातपुते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.
दुसरीकडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानराज ऊर्फ माऊली पाटील हे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे निकटचे सहकारी आहेत. त्यामुळे देशमुख आणि माऊली पाटील यांनी एकाच मतदारसंघात मोहिते पाटील गटाविरुद्ध शड्डू ठोकला आहे. मोहिते पाटील गटाकडून पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि सध्या श्री शंकर कारखान्याचा कारभार पाहणारे अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील निवडणूक रिंगणात आहेत.
प्रचाराच्या मैदानात दिग्गजांची हजेरी
या तिरंगी लढतीत प्रचाराची जबाबदारी दिग्गज नेत्यांनी घेतली आहे. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील आणि वेळप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील प्रचारात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशमुख यांच्यासाठी माजी आमदार राम सातपुते आणि मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे सक्रिय आहेत. माऊली पाटील यांच्या प्रचाराची धुरा स्वतः आमदार उत्तमराव जानकर यांनी सांभाळली आहे.
विजयाचे अंतर कमी राहणार
केवळ १४० मतदार असलेल्या या सोसायटी मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. तीनही उमेदवारांनी ताकद लावल्याने विजयाचे अंतरही कमी राहण्याची शक्यता आहे. पिलीव येथील संग्रामसिंह जहागीरदार हेही निवडणूक रिंगणात असले, तरी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी या तीन प्रमुख उमेदवारांचीच लढत आहे. त्यामुळे माळशिरसच्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.