Crime
Crime sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

तिहेरी हत्याकांडाने सातारा हादरला; अनैतिक संबंधांच्या संशयावरून प्रियकराचे कृत्य

सरकारनामा ब्युरो

रहिमतपूर : वेलंग (शिरंबे) (ता. कोरेगाव) येथे कामानिमित्त राहणाऱ्या महिलेचा अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकराने गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. यानंतर संबंधिताने दोन मुलांना विहिरीत ढकलून खून केला. या घटनेने कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली असून रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी गणेश केंद्रे व रहिमतपूरचे सहायक पोलिस निरीक्षक श्री.कड होते. याबाबतची माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दत्ता नारायण नामदास (मूळचा रा. राजेबोरगाव ता. उस्मानाबाद) हा योगिता (वय ३८) हिच्या ओळखीने वेलंग शिरंबे (ता. कोरेगाव) येथे तिच्यासोबत मागील चार वर्षांपासून राहत होता.

१६ तारखेला (गुरुवारी) वेलंग शिरंबे गावचे पोलिस पाटील सचिन सुतार यांनी रहिमतपुर पोलिस ठाण्यात येऊन माहिती दिली की, दत्ता नारायण नामदास याच्यासोबत राहणारी महिला योगिता ही मृतावस्थेत दिसत आहे. मिळालेल्या माहिती आधारे रहिमतपुर पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिस पाटील सचिन सुतार, घर मालक राजेंद्र भिकू सपकाळ यांच्यासह पोलिसांनी पाहणी केली असता योगिता ही मृतावस्थेत आढळून आली.

पंचनाम्यात योगिताच्या गळ्यावर ओरखडे पडल्याचे तसेच नाकातून रक्तस्त्राव झाल्याचे व चेहरा निळसर पडल्याच्या आढळून आले. यावरून योगिताचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांकडे चौकशी केली असता संबंधित संशयित गावांत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्या मूळ गावी माहिती घेतली असता तो राजे बोरगाव (ता.उस्मानाबाद) येथे असल्याचे समजले.

तसेच त्याची बहीण ज्योती अहिवळे श्रीपूरबोरगाव (ता. अकलूज जि. सोलापूर) यांच्याकडे राहात असल्याचे समजले. त्याला पोलिस पाटील यांनी अकलूज पोलिस ठाण्यात हजर केले. त्यानंतर रहिमतपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेबद्दल अधिक चौकशी केली असता त्याने घटनेचा खुलासा केला. त्याने सांगितले की, योगिता हिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.

या संशयातून १५ तारखेला (बुधवारी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेवण करून झोपी गेल्यानंतर त्याने योगिताचा गळा दाबून खून केला. तसेच मुले समीर (वय १३), तनु (वय १४) यांना बाथरूमला जाण्याचा बहाना करून झोपेतून उठून दुचाकीवरून नेऊन तात्यांच्या मळ्यातील विहिरीमध्ये ढकलून दिले. राहत्या घराला बाहेरून कडी लावून निघून गेल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले. त्यावरुन संशयित दत्ता नारायण नामदास याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार रहिमतपूर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT