Shekhar Gore-Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara-Sangli MLC : ‘सातारा-सांगली’त फडणवीसांच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे ट्विस्ट : शेखर गोरेंच्या उमेदवारीबाबत पुन्हा चर्चा

Devendra Fadnavis Viral Video : सातारा-सांगली विधान परिषद मतदारसंघात भाजप-शिवसेना रस्सीखेच सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या व्हिडिओमुळे शेखर गोरे यांच्या उमेदवारीची चर्चा पुन्हा रंगली आहे.

Vijaykumar Dudhale

Satara, 31 May : सातारा-सांगली विधान परिषद मतदारसंघासाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या मतदारसंघासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये लढाई सुरू आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका जुन्या व्हिडिओमुळे सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीला ट्विस्ट आला आहे. त्या व्हिडिओमुळे शेखर गोरे यांच्या उमेदवारीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिशदेच्या मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक मतदार आहेत, त्यामुळे महायुतीत तो भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक तथा शिवसेना नेते तानाजी पाटील यांनी शनिवारी या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये या मतदारसंघात जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे.

सांगली-सातारा मतदारसंघात भाजपकडे ३१४ मतदार असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस २०५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ११९, शिवसेना १११, काँग्रेस ७३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १ असे राजकीय पक्षांचे संख्याबळ आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यात आघाड्या आणि अपक्षांची संख्याही मोठी आहे.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शेखर गोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर यांची नावे साताऱ्यातून, तर सांगलीतून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सम्राट महाडिक यांची नावे चर्चेत आहेत. कदम यांच्यासाठी ग्रामविकास मंत्री गोरे, तर काटकर यांच्यासाठी उदयनराजे आग्रही आहेत. मात्र आता या सर्व चर्चेत फडणवीस यांच्या व्हिडिओमुळे ट्विस्ट आला आहे.

देवेंद्र फडणवीसांचा तो व्हिडिओ विधानसभा निवडणुकीच्या वेळचा आहे. त्या वेळी शेखर गोरे यांनी जयकुमार गोरे यांच्यासाठी भाजपच्या विनंतीनुसार माघार घेतली होती. त्या वेळी शेखर गोरे यांना विधान परिषदेचा शब्द दिल्याची चर्चा आहे. तोच व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे, त्यामुळे फडणवीस नेमकी कोणाला उमेदवारी देणार, याची उत्सुकता वाढली आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

शेखर गोरे यांनी आपलं स्वःतचं नेतृत्व तयार केले आहे, समाजात आपली एक वेगळी ओळख तयार केलेली आहे. त्यांच्या भाजपसोबत येण्यामुळे महायुतीला विशेषतः भाजपला निश्चितपणे चांगला फायदा होईल. महायुतीच्या माध्यमातून शेखर गोरे यांची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे मी त्यांना आश्वस्त केले आहे. गोरे यांना विधानमंडळात काम करता येईल, अशी कार्यवाही महायुती, भाजपच्या माध्यमातून आम्ही करू, अशी ग्वाहीही मी त्यांना दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT