Satara DCC Bank Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara DCC Bank : दोन जीवलग मित्रांनी प्रथमच एकमेकांविरोधात शड्डू ठोकला; सुनील खत्री मदतीची परतफेड करणार की चॅलेंज देणार?

Koregaon Political News : सातारा जिल्हा बँकेच्या कोरेगाव सोसायटी मतदारसंघात पूर्वी राजकीय तडजोड करणारे राष्ट्रवादीचे सुनील माने आणि भाजपचे सुनील खत्री यंदा आमनेसामने आहेत. घनःश्याम शिंदे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत आणखी चुरस निर्माण झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 12 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोरेगाव सोसायटी मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे खांद्यावर असले, तरी गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत एकमेकांसाठी राजकीय ‘तडजोड’ आणि मैत्री जपणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील माने आणि भाजपचे सुनील खत्री यंदा समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यातच घनःश्याम शिंदे यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत आणली आहे.

भूतकाळात एकमेकांसाठी माघार घेत सत्तेची वाट मोकळी करून देणारे हे दोन्‍ही सुनील यंदा मैत्री टिकवून एकजण माघारीचा मार्ग निवडणार की थेट संघर्षाचा बिगुल फुंकणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सातारा जिल्हा सहकारी बॅंकेत कोरेगाव तालुक्यातून राष्ट्रवादीचे नेते सुनील माने यांनी निवडून येऊन उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली, तर मागील वेळी सुनील माने यांनी आपले मित्र सुनील खत्री यांना मदत करून त्यांना संचालक म्हणून पाठविले. या दोन मित्रांनी वेगवेगळ्या पक्षात असूनही एकमेकांना मदत केली.

यावेळी सोसायटी मतदारसंघातून पुन्हा दोघेही रिंगणात उतरले आहे. तसेच, घनश्याम शिंदे यांचाही अर्ज आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही सुनील मैत्रीपूर्ण लढत करत एकाला संधी देण्याचा निर्णय घेणार का? याची उत्सुकता आहे. तसेच, जावळी विकास सेवा सोसायटीतून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अर्ज भरलेला आहे. तेथील लढत ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असेल.

महिला राखीव मतदारसंघातून कोरेगाव तालुक्यातील अनुपमा फाळके, मोनल साळुंखे, सुनीता भोईटे यांनीही अर्ज भरले आहेत. तसेच, बॅंका व पतसंस्था मतदारसंघातून विद्यमान संचालक रामभाऊ लेंभे यांनी पुन्हा अर्ज भरला आहे. त्यांना यावेळी पुन्हा या मतदारसंघातून संधी मिळणार का? हेही पाहावे लागणार आहे, तसेच अनुसूचित जाती जमातीतून सुरेश गायकवाड रिंगणात आहेत.

एकूणच कोरेगाव तालुक्यातील हालचालीकडे सर्वांच्या नजरा आहेत. कोरेगाव तालुक्यातून जिल्हा बॅंकेचे एकूण १२८ मतदार आहेत. यामध्ये सोसायटीचे ९०, खरेदी-विक्री संघाचा एक, नागरी बॅंका पतसंस्थेतून १८, गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघातील सात, औद्योगिक विणकर आणि मजूर संस्था मतदारसंघातून ११ मतदार आहेत.

कोरेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार जास्त असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर तडजोडीचे राजकारण या मतदारसंघात पाहायला मिळणार का? याची ही उत्सुकता आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोरेगाव तालुक्यातील किती उमेदवार रिंगणात राहणार? यावरही सर्व काही अवलंबून असेल.

शशिकांत शिंदेंनी प्रथमच नवा पर्याय शोधला

कोरेगावचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी औद्योगिक विणकर आणि मजूर संस्था मतदारसंघातून अर्ज भरला आहे. या मतदारसंघातून तब्बल १८ उमेदवार रिंगणात आहेत. कोरेगाव तालुक्यातील श्रीमंत झांजुर्णे हेही रिंगणात आहेत. यासह इतर दिग्गज उमेदवारही या मतदारसंघात असल्याने शिंदे यांचे आव्हान कायम राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT