Devendra Fadanvis, Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : पाणी फेरनियोजनाचे श्रेय उदयनराजेंनी दिले साताऱ्यातील जनतेला

Umesh Bambare-Patil

Satara News : पाण्यापासून वंचित असणाऱ्यांच्‍या वेदना आम्‍ही उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगत प्रयत्‍न सुरू केले होते. या प्रयत्‍नांची परिणिती म्‍हणून जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या पाण्याचे फेरनियोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयामुळे लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना तसेच बोंडारवाडी धरण प्रकल्पासाठी पाणी उपलब्‍ध झाले आहे. हे यश आम्ही प्रकल्पग्रस्तांसह जिल्हावासीयांना समर्पित करतो, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.

सातारा जिल्ह्यात ११ छोटे-मोठे जलप्रकल्‍प असले तरी शाश्‍‍वत पाण्‍यासाठी जिल्‍हावासीयांना आंदोलने छेडावी लागत आहेत. ही आंदोलने पाहून माझ्‍या मनास वेदना होतात, असे सांगून खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale म्हणाले, याबाबत वारंवार तत्कालीन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्‍याकडे २०१६ ते २०१८ या काळात पाठपुरावा करत चार बैठका घेतल्‍या होत्‍या.

पाठपुराव्‍यामुळे शासनाने पाणी फेरनियोजन जाहीर केले असून, यामुळे बोंडारवाडी धरणामधून एकूण ५४ गावांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. बोंडारवाडीच्‍या अनुषंगाने सुरू असणाऱ्या तांत्रिक कामांसाठी आम्‍ही स्‍वत:ची जमीनदेखील देऊ केली आहे.

लवादात अडकू नये, यासाठी धरणाला तत्त्वतः मान्‍यता देण्‍यात आली असून, हे काम जलसिंचन विभागाऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पूर्ण करणे आवश्‍‍यक असल्‍याचेही त्‍यांनी निवेदनात नमूद केले आहे. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळण्यासाठी वेटणे- रणसिंगवाडी येथे सुरू असणाऱ्या आंदोलनास भेट देत संवाद साधला. त्‍यांच्‍या अडचणी ऐकून वेदना झाल्‍या.

धरणांच्‍या जिल्ह्यात नागरिकांची पाण्‍यासाठी होरपळ सुरू असल्‍याने त्‍याबाबत तेथूनच देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी दूरध्वनीवर संपर्क साधत चर्चा केली. फडणवीस हे संवेदनशील मनाचा नेता म्हणून सर्वदूर ओळखले जातात, याची प्रचिती यानिमित्ताने आली. त्यांनी तातडीने कृष्णा सिंचनाचे सुधारित फेर पाणीवाटप मंजूर करून तसा शासन निर्णय जाहीर केला.

यानुसार कृष्णा सिंचन प्रकल्पाचे सुधारित पाणी वापर पूर्वीइतकाच म्हणजे ३२.०८५ अब्‍ज घन फूट राहणार आहे. फेरनियोजनानुसार सिंचनासाठी ३०.१३, पिण्यासाठी १.५३८ तर औद्योगिक वापरासाठी ०.४१७ अब्‍ज घन फूट इतके पाणी उपलब्‍ध होणार आहे. यानुसार जिहे- कठापूरकरिता ५.७४२, बोंडारवाडीसाठी ०.७९८, अब्‍ज घन फूट इतके पाणी वापरता येणार असून, यापुढील कार्यवाही कृष्‍णा खोरे महामंडळाने करायची आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

फडणवीस यांना समाजाचा कळवळा...

फडणवीस यांच्‍याशी माझी मैत्री असून, त्‍यांना समाजाचा कळवळा आहे. या कळवळ्यातूनच त्‍यांनी झटपट निर्णय घेतला. आजपर्यंतची त्‍यांची कार्यशैली बिनतोड राहिली आहे. त्यामुळेच जिहे-कठापूरसहीत बोंडारवाडी धरणाची, रणसिंगवाडी-वेटणे येथील पाण्याची कोंडी फेर पाणीवापर नियोजन करत त्‍यांनी फोडली.

हे यश माझे किंवा फडणवीस यांचे नाही. आम्‍ही फक्‍त आमचे कर्तव्‍य बजावले आहे. पाणी फेरवाटप नियोजनाचे हे यश प्रकल्पग्रस्तांचे आणि तमाम जिल्हावासीयांचे आहे. बोंडारवाडी धरणग्रस्तांना आम्ही कधीही अंतर देणार नसल्‍याचे निवेदनात नमूद करत जनतेचे आभारही उदयनराजे यांनी मानले आहेत.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT