Satara, 04 February : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीवरून भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले हे प्रचंड आक्रमक झाले आहेत. बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाात, आर्थिक बोझ्याचे कारण देऊन पगारवाढीचा करारनामा नूतनीकरणास विलंब केला जात असेल तर अमृतमहोत्सवी वर्षाच्या थाटामाटात केलेल्या कार्यक्रमाच्या वेळीही आर्थिक बोझ्याची आठवण ठेवायला हवी होती. पगारवाढीचा करारनामा तातडीने करावा; अन्यथा आम्हाला वेगळा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशाराही उदयनराजेंनी दिला आहे.
उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी बॅंक प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीत कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, या बँकेला या टप्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या पगारवाढीच्या करारनाम्याची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा करारनाम्याचे नूतनीकरण गेली दहा ते अकरा महिन्यांपासून रखडले आहे. बॅंकेचे सध्या अमृतमहोत्सवी वर्षे सुरू आहे. त्यात पगारबाबतचे करार न होणे ही नामुष्कीजनक गोष्ट आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा करारनामा तातडीने करण्याबरोबरच फिनॅकल सॉफटवेअरमुळे निर्माण होत असलेल्या तक्रारींवर उपाययोजना करणे आवश्यक आहे; अन्यथा आम्हाला वेगळा पवित्रा घ्यावा लागेल, असा सूचक परंतु गर्भित इशारा सातारा डीसीसी बॅंकेच्या (Satara Dcc Bank) व्यवस्थापन आणि प्रशासनाला दिला आहे.
बॅंकेच्या व्यवस्थापनाकडून आर्थिक बोझ्याचे कारण सांगून पगारवाढीचा करारनामा नूतनीकरणास चालढकल केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काटकसरीची आठवण अमृतमहोत्सवी वर्षाच्या थाटामाटात केलेल्या कार्यक्रमाच्या वेळी ठेवायला हवी होती. फिनॅकल सॉफटवेअरचा केलेला बदल आणि त्यामुळे करावी लागलेली प्रिंटर्सची खरेदी, अन्य बाबींवर अनावश्यक खर्च करावा लागला आहे. त्यावेळी आर्थिक बोझ्याचा का विचार केला नाही,असाही सवाल उदयनराजेंनी केला आहे.
सातारा जिल्हा सहकारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा करारनामा याअगोदरचे होणे अपेक्षित होते. मात्र, कर्मचाऱ्यांना पगारवाढीपासन वंचित ठेवणे कोणत्याही संचालकास मान्य नाही. आर्थिक बोझ्याचे कारण न देता कर्मचाऱ्यांना न्याय देणे महत्वाचे आहे. बॅंक कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ करावी तसेच फिनॅकल सॉफटवेअरसंदर्भात योग्य ती उपाययोजना करावी; अन्यथा आम्ही वेगळा पवित्रा घेतल्यास, त्यास सर्वस्वी बँकेचे व्यवस्थापन आणि बँक प्रशासन जबाबदार राहील, असा गर्भित इशाराही उदयनराजेंनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.