Udayanraje.jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje On Statue Collapse : उदयनराजेंची पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवर पहिली प्रतिक्रिया; राजकारण करणाऱ्यांना झापलं

Deepak Kulkarni

Satara Udayanraje Bhosale News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.आठ महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेला महाराजांचा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावरुन विरोधकांनी राजकारण तापवलं आहे.

पंतप्रधान मोदी,मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर माफी मागून विषय मिटलेला नाही. उलट विरोधाची धार आणखी तीव्र होताना दिसून येत आहे.याचदरम्यान, आता खासदार उदयनराजे भोसले यांनी पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी विशेष पत्रकाव्‍दारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, राजकोटमधील पुतळा दुर्घटना दुर्देवी आणि अचानक घडलेली आहे. देशातील सर्व जाती धर्मातील नागरिकांत या घटनेचे दु:ख आहे.

पुतळा उभारणीतील कच्चे दुवे, निसर्गाची अवकृपेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचे समोर येत आहे. या घटनेचे कोणी स्वत:च्या लाभासाठी राजकारण,भांडवल करु नये तसेच कोणाला लक्ष्‍य बनवू नये अशा शब्दांत घटनेचं राजकारण करणार्यांना सुनावलं आहे.

उदयनराजे पत्रकात म्हणतात,समाजाने संयम बाळगावा. जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन करण्‍याची मागणीही त्यांनी केली आहे. याचवेळी समुद्रतटीय निसर्गनियमांचा, वातवरणीय बदलांचा अभ्यास करत त्‍याचजागी पुन्‍हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी पुतळा उभारण्‍यात यावे असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अलौकिक कार्याचा आमच्यासह तमाम देशवासियांना सार्थ अभिमान आहे.त्यांची शिकवण आणि राज्यकारभार आजच्या घडीला सुध्दा अत्यंत उपयुक्त आहे. महाराजांच्या अल्प आयुष्यातील,अतुलनीय,अजोड कार्य आपल्या सर्वांच्या जीवनातील प्रत्येक वळणावर दिपस्तंभासारखे असल्याचे कौतुकोद्गारही खासदार उदयनराजे यांनी काढले आहे.

...तर ते मान्‍य होणार नाही!

राजकोट येथील पुतळा कोसळण्याची दुर्घटना प्रत्येकाच्या मनाला क्लेशदायीच आणि निषेधार्ह आहे.तथापि या घटनेचे भांडवल करणाऱ्यांकडून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी कृत्ये होत असतील तर ते शिवविचारांचा पाईक असणाऱ्यांना मान्‍य होणार नाही.या घटनेच्या सखोल चौकशी अंती जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शासन व्हावे,अशी मागणीही उदयनराजे यांनी पत्रकाव्‍दारे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT