Shahu Maharaj Chhatrapati  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahu Chhatrapati : शाहू महाराजांवर टीका, आघाडीचे नेते आक्रमक; संजय मंडलिकांना कडक शब्दांत सुनावलं

Kolhapur Lok Sabha Constituency : आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : महायुती आणि महाविकास आघाडीचे नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू छत्रपती हे कोल्हापूरचे महाराज आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे खळबळजनक विधान केले होते. याबाबत साम वृत्तवाहिनीने सर्वात आधी बातमी प्रसिद्ध केली. मंडलिकांच्या या वक्तव्याचा महाविकास आघाडीतील नेत्यांनी कडक शब्दांत समाचार घेतला आहे.

चंदगड तालुक्यातील नेसरी येथील सभेत खासदार मंडलिकांनी शाहू छत्रपती यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असा निशाणा मंडलिकांनी शाहू छत्रपती यांच्यावर साधला आहे. यावर महाविकास आघाडीचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे सतेज पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सडकून टीका केली.

मंडलिकांच्या विधानाने कोल्हापुरचे वातावरण चांगलेच ढवळले आहे. माजी मंत्री सतेज पाटलांनी मंडलिकांनी केलेल्या विधानाचा निषेध केला. ते म्हणाले, कोल्हापूरकर कधीही सहन करणार नाहीत असे मंडलिकांनी विधान केले आहे. महाराजांचे विजय निश्चित असून त्यांचे लिड एक लाखाच्या पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातूनच मंडलिकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी असे विधान केले. त्यांनी शाहू छत्रपतींची माफी मागावी. निवडणूक राहिली एका बाजूला मात्र कोल्हापूरकर म्हणून त्यांचे विधान आम्ही सहन करणार नाही.

निवडणुकीचा निकाल स्पष्ट होत असल्याने मंडलिकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यातून ते अशी विधान करत असल्याचे जयंत पाटलांनी निशाणा साधला. तर संजय राऊतांनी आपल्या शेलक्या शब्दांनी मंडलिकांना सुनावले. राज्याला सामाजिक दिशा दिली त्या गादीच्या वारस असलेल्या शाहू छत्रपतींबाबत अशी विधाने करणे हे दुर्दैवी आहेत. डुब्लिकेट शिवसेनेने सर्व ताळतंत्र सोडले आहे. त्या शिवसेनेच्या नेत्यांनी कोल्हापूरच्या गादीचा अपमान केला आहे. त्यांना कोल्हापूरची जनता धडा शकवल्याशिवाय राहणार नाही.

आखाड्यात उतरल्यावर विरोधी मल्लाला हातच लावायचा नाही. त्या मल्लाला टांगच मारायची नाही. मग ती कुस्ती कशी होणार? असे म्हणत मंडलिकांनी काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचेही दिसत आहे. यावर सतेज पाटील म्हणाले, कुस्ती करा ना पण पातळी सोडू नका. यापूर्वीच त्यांनी शाहू छत्रपती यांच्याबाबत कोणतीही वयक्तिक टीका करणार नाही, असे जाहीर केले होते. असे असूनही मंडलिक बोलले आहेत. मग त्यांचे बोलवते धनी कोण आहेत का, हेही पाहावे लागले. याचे परिणाम महायुतीला कोल्हापूरच नाही तर राज्यात भोगावे लागणार आहेत, असा इशाराही पाटलांनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT