Udayanraje bhosale, shivendraraje bhosale
Udayanraje bhosale, shivendraraje bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगरसेवक खंदारेच्या आडून उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर निशाणा...

सरकारनामा ब्युरो

सातारा : खूनाचा प्रयत्‍न आणि जबरी चोरीचा गुन्‍हा दाखल असणारा आमदारांच्या नगर विकास आघाडीचा नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे हा पोलिसांना सापडत नाही. गंभीर गुन्‍ह्यातील संशयितांना जामीन मिळवून देण्‍यासाठी न्‍यायालयाची दिशाभुल केली जातेय. यात पोलिस अधिकारी, सरकारी वकील आणि लोकप्रतिनिधींची मिलीभगत आहे, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी खंदारेच्‍या मुद्यावरुन नाव न घेता उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍यावर टीका केली.

उदयनराजे म्‍हणाले, नागरीक म्‍हणून मी मत मांडतोय. काही प्रकरणांत पोलिस यंत्रणा लोकप्रतिनिधींच्‍या दबावाखाली काम करते. यामुळे अन्‍यायग्रस्‍ताला पोलिसांकडून न्‍याय मिळत नाही. दबावातील पोलिसांनंतर सांगतोय तशीच तक्रार दे, हे नाव घेवू नको, असे फिर्यादीस सांगतात. कशासाठी हे सगळे. साताऱ्यातील गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलिस अधिकारी, सरकारी वकील तसेच न्‍यायव्‍यवस्‍थेत सहभागी असणाऱ्या प्रत्‍येकाने आपण समाज घटक असल्‍याचे विसरु नये.

आज कुणावर तरी हल्‍ला झाला, उद्या दुसऱ्यावर होईल, परवा तुमच्‍यावर होवू शकतो. मग त्‍यावेळी तुम्‍ही कोठे जाणार. गंभीर गुन्‍ह्यातील संशयितांना जामीन मिळवून देण्‍यासाठी न्‍यायालयाची दिशाभुल केली जातेय. यात पोलिस अधिकारी, सरकारी वकील आणि लोकप्रतिनिधींची मिलीभगत आहे. हा आरोप मी नागरीक म्‍हणून करतोय. गंभीर गुन्‍हा दाखल असणारा खंदारे पोलिसांना सापडत नाही. दहशत माजविणाऱ्याला तिकीट द्यायचे, निवडून आणायचे आणि त्‍याच्‍या दहशतीचा वापर स्‍वत:च्‍या निवडणुकीवेळी करायचा. कोण देत त्‍याला तिकिट, कोण निवडून आणते. त्‍याचा पाठीराखा कोण हे सगळ्या सातारकरांना माहित आहे.

काही संशयितांच्‍या जामीन आदेशात काही नोंदी आहेत. त्‍या नोंदी गंभीर असून त्‍या जामीन आदेशाचा वापर राज्‍यातील नव्‍हे तर देशातील सराईत गुन्‍हेगार जामीन मिळवण्‍यासाठी करतील. असे गुंड जामीनावर बाहेर आले तर देशात, राज्‍यात मोठा उद्रेक होईल. जामीन पत्रातील नोंदीचा फेरविचार होणे आवश्‍‍यक आहे. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्‍ठ न्‍यायालयाने करणे आवश्‍‍यक असून त्‍यासाठी न्‍यायमुर्तींनी हस्‍तक्षेप करणे आवश्‍‍यक असल्‍याचे मतही त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.

काय तुमचा वचक....

वा... लोकप्रतिनिधी... वा काय तुमचा वचक. कोणाला पाठीशी घालताय, कशासाठी अशा शब्‍दात उदयनराजेंनी नाव न घेता शिवेंद्रसिंहराजेंवर टीका केली. मी सर्वसामान्‍यांसाठी आवाज उठवतो म्‍हणून माझ्‍यावर खंडणीच्‍या केसेस टाकल्‍या गेल्‍या. खंदारेवर यापूर्वी दाखल झालेल्‍या गोळीबार तसेच आनेवाडी टोलनाक्‍याच्‍या अनुषंगाने दाखल गुन्‍ह्‍यातील शस्‍त्रे पोलिसांना जप्‍त करता आलेली नाहीत, या विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर बाबा.. बघा आता तुम्‍हीच, असे म्‍हणत पुन्‍हा एकदा त्‍यांनी शिवेंद्रसिंहराजेंवर टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT