Satara bjp News : भाजपच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या महाराष्ट्रातील पहिल्या उमेदवारांच्या यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने गुरुवारी त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी शासकिय विश्रामगृहात भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना जाब विचारत धारेवर धरले.
यावेळी ‘मान छत्रपतींच्या गादीला आणि मतही गादीला’ अशी भूमिका कार्यकर्त्यांनी व्यक्त करत जिल्हाध्यक्षांनी नेमकी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी लावून धरली. त्यावर लोकसभा संयोजक सुनील काटकर यांनी सर्वांना शांत करत उद्या (शुक्रवारी) खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा करून भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष भूमिका मांडतील, असे सांगितल्याने कार्यकर्ते शांत झाले.
खासदार उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभेसाठी इच्छुक असूनही त्यांचे नाव भाजपच्या महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत नसल्याने हा छत्रपतींचा अपमान आहे, असे सांगत त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले. सातारामधील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत सर्वच कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच प्रथम भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सर्वांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच उदयनराजेंच्या(Udayanraje Bhosale) बाबत केंद्रीय नेतृत्वाकडे कोणी चुकीची माहिती पोहचवली. त्याचे नाव जाहीर करा, अशी भूमिका घेत आक्रमक झाले. त्यानंतर अनेकांनी आपल्या भूमिका मांडल्या. यामध्ये प्रवीण धस्के, संतोष जाधव, पंकज चव्हाण, चिन्मय कुलकर्णी, श्रीकांत आंबेकर आदींनी आपल्या भूमिका मांडल्या.
यानंतर भाजपचे सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देत जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या समावेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून योग्य ती भूमिका मांडली जाईल. कार्यकर्त्यांनी हतबल होऊ नये, असा सल्ला दिला, सर्वांना शांत केले. उद्या (शुक्रवारी) खासदार उदयनराजेंशी चर्चा करुन आपण पुढचे पाऊल उचलू असे त्यांनी सांगितले.
सहा विधानसभा शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची भेट घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थिती झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतही खासदार उदयनराजे भोसले यांनाच तिकीट मिळावे असा आग्रह धरण्यात आला होता. मात्र या संदर्भात वरिष्ठ कार्यकारणीकडून कोणतेही थेट आश्वासन न मिळाल्याने उदयनराजे समर्थक आक्रमक झाले.
यावेळी प्रवीण धस्के, शरद काटकर, पंकज चव्हाण, सौरभ सुपेकर, संग्राम बर्गे, संतोष जाधव, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांचे नाव मतदार यादीतून डावल्यास पोवई नाक्यावर सामुहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला. यावेळी लोकसभा संयोजक व उदयनराजे समर्थक सुनील काटकर यांनी कार्यकर्त्यांना शांततेचा सल्ला दिला. कोणीही उदयनराजे यांच्या विचाराला गालबोट लावू नये. भाजपच्या महिला मेळाव्यात सुद्धा उदयनराजे यांना तिकीट देण्यात यावे, ही मागणी एकमुखी करण्यात आलेली आहे.
उमेदवारी जाहीर होण्याची काही प्रक्रिया पार पाडावी लागेल. यासंदर्भात वाटाघाटी सुरू आहेत. कार्यकर्त्यांनी हातबल होऊ नये. उदयनराजे यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत योग्य ती भूमिका उद्या (शुक्रवारी) सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत मांडली जाईल, अशी माहिती सुनील काटकर यांनी दिली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.