Uddhav and Raj Thackeray Appear United – Political Significance : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत युतीचे संकेत दिले. तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज्यभरात मनसैनिकांसह शिवसैनिकांना ऊर्जितावस्था मिळाली आहे. मात्र कोल्हापुरातील परिस्थिती उलट आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर देखील कोल्हापुरातील नेत्यांमध्ये मतभिन्नता दिसून येते. एकंदरीतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात अजून नेत्यांना सूर सापडत नाही. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नेता मिळत नाही, अशीच परिस्थिती या निमित्ताने दिसून येते.
कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परिस्थिती पाहता केवळ पदापुरतेच जिल्ह्यात मनसेची सेना आहे की काय अशी शंका उपस्थित होते. नागरी समस्यांच्या प्रश्नापेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना केवळ व्यापारी मॉल मधील आंदोलनात अधिक रस असल्याचे दिसते. शिवाय प्रमुख पदाधिकारी यांचे लागेबंधे पहिल्यापासूनच काँग्रेस आणि सध्या भाजपच्या नेत्यांसोबत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांसोबत यांचे जमतच नाही हे चित्र आहे.
मनसेचा एखादा पदाधिकारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतरच कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची छबी दिसते. हेच वास्तव कोल्हापूर जिल्ह्यातील मनसेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील परिस्थिती पाहता सध्या जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांची निवड झाल्यानंतर अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. त्यातच काही जुने आणि निष्ठावंत प्रमुख पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत.
नूतन जिल्हाप्रमुख रविकिरण यांची निवड झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत राजकारणाचा बोजवारा उडाला आहे. यापूर्वी महानगरपालिकेत निवडून आलेले नगरसेवक देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. काही मोजकेच नगरसेवक सध्या ठाकरे यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि मनसेची परिस्थिती पाहता सध्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील यांचे मनोमिलन होणे याची शक्यता कमीच आहे. वरिष्ठ स्तरावर नेत्यांच्या आदेशानंतरच थोडाफार बदल निश्चित आहे. पण प्रत्येकाचा मूड भविष्यातील राजकारणाच्या मिळता जुळता असेल असे एकूणच चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.