
बातमीत थोडक्यात काय?
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गिरगावातील आपल्या मराठी माध्यम शाळेला भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि मातृभाषेत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
गवई यांनी पैशाची किंमत, शिस्त, संवादकौशल्य आणि मूल्यांचे संस्कार बालपणातील अनुभवांतून कसे मिळाले, हे भावूकतेने सांगितले.
शाळेतील स्वागत, जुन्या वर्गमित्रांशी आणि शिक्षकांशी भेट, आणि शाळेतील मराठी संस्कृतीवरील अभिमान त्यांनी विशेषत्वाने व्यक्त केला.
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी मुंबईतील आपल्या शाळेला भेट दिली. गिरगांवमधील चिकित्सक समूहाचे शिरोळकर हायस्कूलमध्ये सरन्यायाधीशांनी इयत्ता 3री ते 7वी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतले होते. या भेटीमध्ये त्यांनी शाळेतील अनेक जुन्या आठवणींना उजाळा देतानाच मराठी माध्यमातून शिकण्याबाबतही त्यांनी महत्वाचे भाष्य केले.
सरन्यायाधीश गवई यांनी या शाळेमध्ये 1969 ते 1973 या काळात शिक्षण घेतले होते. त्यावेळी त्यांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतल्याचे आठवण करून देताना मातृभाषेत शिक्षण घेतल्याने केवळ संकल्पनात्मक स्पष्टता वाढत नाही तर जीवनभराची मूल्ये देखील रुजतात, आपला पाया मजबूत होतो, असेही सांगितले.
मराठी माध्यमातून शिक्षणामध्ये कोणतीही कमतरता नव्हती. शाळेत होणारी वादविवाद स्पर्धा आणि पीटी क्लासमुळे शिस्त आणि बोलण्याची कला विकसित झाली. त्यावेळी जोशी सर पीटीचे शिक्षक होते, यांसह अनेक आठवणी गवई यांनी यावेळी सांगितल्या. जुन्या आठवणींना उजाळा देताना गवई यांनी आपल्याला लहानपणीच पैशांचे महत्व समजल्याचे सांगितले.
पैसे वाचविण्यासाठी शाळेसाठी काही अंतर पायी जाणे, नंतर बसने प्रवास करणे, अशी कसरत त्यांना करावी लागत होती. आपली आई केवळ 20 पैसे द्यायची. बेस्टच्या पाच क्रमांकाच्या बसने शाळेला जायचे. त्यावेळी तिकीट केवळ 5 पैसे होते आणि 5 पैशांचा समोसा खायचो, अशी आठवण सरन्यायाधीशांनी सांगितली.
आई देत असलेल्या रोजच्या 20 पैशांतून येण्याजाण्याचा आणि खाण्याचा खर्च भागायचा, असे सरन्यायाधीशांनी भावूक होत सांगितले. गवई यांच्या स्वागतासाठी शाळेतील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी सहा महिने तयारी केली होती. यावर बोलताना त्यांनी देश-विदेशात अनेक ठिकाणी सन्मान झाला, पण विद्यार्थ्यांनी केलेले हे स्वागत मनाला भिडणारे होते, असे सरन्यायाधीश म्हणाले.
शिरोळकर हायस्कूलचे रुपांतर आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले आहे. पण अजूनही शाळेत मराठी संस्कृती जिवंत असल्याचे सरन्यायाधीशांनी यावेळी अभिमानाने सांगितले. या भेटीदरम्यान यांनी शाळेतील वर्गखोल्या, ग्रंथालय आदी ठिकाणांना भेटी दिल्या. तसेच त्यांना वर्गातील जुने मित्र, शिक्षकांचीही त्यांनी आवर्जून भेट घेतली. आज आपण कोणत्याही पदावर असलो तरी त्यामध्ये शाळा आणि शिक्षकांची महत्वाची भूमिका राहिल्याचे सरन्यायाधीश म्हणाले. शाळेमध्ये मिळालेल्या संधींमुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
प्रश्न: सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोणत्या शाळेला भेट दिली?
उत्तर: गिरगावमधील शिरोळकर हायस्कूल शाळेला भेट दिली.
प्रश्न: गवई यांनी कोणत्या माध्यमातून शिक्षण घेतले होते?
उत्तर: त्यांनी मराठी माध्यमातून 3री ते 7वी इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले.
प्रश्न: शाळेतील कोणती आठवण सरन्यायाधीशांनी भावूकतेने सांगितली?
उत्तर: आईने दिलेल्या 20 पैशांत शाळा, बस आणि समोशाचा खर्च भागवण्याची आठवण.
प्रश्न: गवई यांनी मराठी शिक्षणाबाबत काय मत व्यक्त केले?
उत्तर: मातृभाषेत शिक्षणामुळे संकल्पनांची स्पष्टता व जीवनमूल्ये आत्मसात होतात, असे मत त्यांनी मांडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.