Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MVA Politics: महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर? सांगलीतील शिवसैनिकांची थेट मातोश्रीवर जाऊन ठाकरेंकडे तक्रार

Maharashtra Local Elections 2025: ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीतील संपूर्ण माहितीचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी या संदर्भात मार्गदर्शन केले.

Mangesh Mahale

Sangali News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासंदर्भातील नेत्यांची तक्रार करत आपले गाऱ्हाणे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीला आम्हाला निमंत्रण दिले जात नसल्याची खंत सांगलीतील शिवसैनिकांनी ठाकरे यांच्यासमोर मांडली.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधला. त्यात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील जिल्हाप्रमुख, महिला आघाडी संघटक, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी आदी उपस्थित होते. चंद्रकांत खैरे, सचिव विनायक राऊत, सांगलीचे संपर्क नेते आमदार सुनील प्रभू, संपर्कप्रमुख नितीन बानगुडे-पाटील, 'बेस्ट'चे माजी अध्यक्ष अरुण दुधवडकर उपस्थित होते.

यावेळी पक्षप्रमुख ठाकरे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीतील संपूर्ण माहितीचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी या संदर्भात मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकीला सज्ज राहण्याच्या सूचना देत असताना सांगलीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट महाविकास आघाडीतील इतर पक्षांची तक्रार ठाकरे यांच्यासमोर केली. जिल्ह्यात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. मात्र त्याला आपल्याला डावलले जात आहे. त्यांच्याकडून कोणताही निरोप दिला जात नाही,' अशा स्वरुपाची तक्रार आज जिल्ह्यातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

महाविकास आघाडीचे घटक पक्ष बैठका घेत आहेत, अशी चर्चा आहे. त्यात शिवसैनिकांना बोलावले जात नाही, असा सूर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी आळवला. नगरपालिका क्षेत्रातील निवडणुकांची माहिती देण्यात आली. जिल्हाप्रमुखांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी कशा पद्धतीने साथ देते, याची चर्चा करावी, अन्यथा शिवसैनिकांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी ठेवावी, अशा सूचना दिल्या.

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत आहे. मराठी आणि महाराष्ट्रहिताची भूमिका घेऊन पुढे जाताना ताकदीने लढा. आपण जिंकू, असा विश्वास ठाकरे यांनी दिला. पुढील आठवड्यात जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हा उपप्रमुखांनी तालुकानिहाय दौरे करावेत. नगरपालिका क्षेत्रातील चाचपणी करावी, अशा सूचना दिल्या. महाविकास आघाडी करायची किंवा स्वतंत्र लढायचे, याबाबतीत निर्णय पक्षप्रमुख घेतील, मात्र दगाफटका होऊ नये, यासाठी स्वबळाची तयारी ठेवा, अशा सूचना नेत्यांनी दिल्या. सांगली जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, संजय काटे, शंभूराज काटकर, विशालसिंग रजपूत उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT