Solapur, 20 September : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना स्टेजवर उभं करावं आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला पन्नास खोकी दिली आहेत, असं जाहीर करावं. नाही तर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की, आम्हाला काय पन्नास खोकी-बोकी दिलेली नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेसमोर एकदाचा सोक्षमोक्ष होऊनच जाऊ द्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर आधारित ‘मला काय सांगायचं’ हे नाटक येत आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ‘पन्नास खोकी एकदम ओके’ या नाटकाच्या माध्यमातून उत्तराची तयारी चालवली आहे. त्याबाबत बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यापासून खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिव्या घालण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करत नाहीत.
राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे ठाकरेंचे अजिबात लक्ष नाही. शेतकरी, शेतमजूर, महिला असे राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत, त्यामुळे ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. या जळक्या वृत्तींनी हा नाटकाचा केलेला प्रकार आहे, असेही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
निवडणुकीच्या तोंडावर असे नाटकासारखे प्रकार होत असतात. सध्या येणारी नाटके ही प्रचाराचा भाग जरी मानली तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाटक हे त्यांनी केलेल्या कामावर आणि भविष्यात त्यांना महाराष्ट्र प्रगतिपथावर जाण्यासाठी जो वेध घ्यायचा आहे, हे या नाटकातून सांगण्यात आलेले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेकडून येणारे नाटक हे फेक नेरिटिव्हचा भाग असणार आहे, असा टोलाही शहाजी पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
उद्धव ठाकरे यापुढे मुख्यमंत्री होणार नाहीत
आम्हाला एकही जागा नको; पण मुख्यमंत्रिपद द्यावे, अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आता आलेले आहेत. पण, उद्धव ठाकरे हे यापुढे मुख्यमंत्री होणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, अशी भविष्यवाणीही शहाजी पाटील यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.