CM Eknath Shinde News: शाखाप्रमुख, नगरसेवक, मंत्री, पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री.. एकनाथ शिंदे नाम ही काफी है!

Eknath Shinde Politics : काहीसे सौम्य स्वभावाचे शिंदे पक्षासाठी अधिक वेळ देतात. जर शिंदे उद्धव ठाकरेंच्या मागे राहिले असते तर त्यांना नेतृत्व करण्याची संधी कधीच मिळाली नसती. ठाकरेंपासून दूर जाताना स्वत:ची क्षमताही त्यांनी सिद्ध करून दाखविली आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : एक सामान्य कार्यकर्ता, पक्षाचा प्रमुख ते मुख्यमंत्रिपदाचा प्रवास तसा सोपा नव्हता. अनेक चढ-उतार पाहिलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्याने बंडही तितक्याच शांततेत करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का दिला. आणखी पाच वर्षे शिंदेंना संधी मिळाली तर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री भूषविणारे म्हणून ते ओळखले जातील. पण प्रश्‍न असा आहे की, हा पक्ष आज भाजपच्या टेकूवर उभा आहे. जोपर्यंत भाजपची साथ आहे, मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे तोपर्यंत अच्छे दिन असतील. पुढे शिवसेना कशी टिकवायची, हे आव्हान असेल.

शिवसेनेचा इतिहास असे सांगतो, की कोणताही नेता फुटला की त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल नसतो. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्याला अपवाद म्हणावे लागतील. एकेकाळी बंडू शिंगरे यांनीही प्रतिशिवसेनेची स्थापना करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आव्हान दिले होते. त्यांचा प्रयोग यशस्वी झाला नाही. उलट बाळासाहेबांची संघटना आणि पक्ष नेहमीच राज्याच्या राजकारणात ढोलताशे वाजवत गर्जत राहिला. या पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून बाळासाहेब शेवटपर्यंत राहिले. दुसरा शिवसेनाप्रमुख होणे नाही याची जाणीव ठेवत शिवसेनेने पक्षप्रमुखपद निर्माण केले.

गेल्या पाच दशकात शिवसेना फुटली. छगन भुजबळ, राज ठाकरे, गणेश नाईक, नारायण राणे आदी नेत्यांनी बंड केले पण ते नेहमीच सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला गेले. भुजबळ, नाईक, राणे हे काँग्रेसवासी झाले. फक्त राज यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यांची कामगिरी प्रारंभी उत्तमच होती. पण, मोदी लाटेनंतर आणि मोदींच्या राजवटीत मनसेला धक्के बसले.

‘लोकसभे’त कामगिरी

२० जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनीही बंड केले पण, कधी नव्हे इतका हादरा या बंडाने शिवसेनेला दिला. निम्म्याहून अधिक शिवसेना (Shivsena) फुटली. कोकण, मुंबई, ठाणे, मराठवाड्यातील बडे नेते म्हणजे खासदार आणि आमदारानीही शिंदेंना पाठिंबा दिला. दोन वर्षापूर्वी असे वाटले होते की शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. पण, भाजपचे केंद्रीय नेतृत्व नेहमीच 2014 पासून धक्का देण्याचे राजकारण करत आले.

कोणता पत्ता बाहेर काढतील आणि कधी कोणत्या नेत्याचे नशीब बदलेल हे काही सांगता येत नाही. महाराष्ट्रातही तसेच झाले. शिंदे यांना थेट मुख्यमंत्री करून उद्धव ठाकरेंना काय संदेश द्यायचा तो दिला. गेल्या दोन वर्षांपासून शिंदे मुख्यमंत्री आहेत. प्रशासनावर पकड निर्माण करण्यात त्यांना यश आले. लोकसभेला जे काही निकाल लागले त्याचा विचार करता शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपपेक्षा उत्तम कामगिरी केली, असे म्हणावे लागेल.

CM Eknath Shinde
Assembly Election : निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का; केंद्रीय मंत्र्यांच्या पुतण्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पक्षावर पकड

शिवसेनेत नेहमीच मुंबईतील नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. शिंदे यांनी मात्र हे वर्चस्व मोडून काढले. ठाण्याच्या शिंदे यांनी शिवसेना पक्ष तर स्वत:च्या ताब्यात घेतलाच पण, ज्या बाळासाहेबांनी शिवधनुष्य चिन्ह दिले होते ते ही स्वत:कडे ठेवण्यात यश मिळविले. भाजपच्या पाठिंब्याने का होईना पण, शिवसेना पक्षावर स्वत:ची पकड निर्माण केली.

आनंद दिघे यांच्या निधनानंतर शिंदे यांचे राजकारण खऱ्या अर्थाने बहरत गेले. ठाणे जिल्ह्यावर त्यांनी दिघेंच्या पश्‍चात वर्चस्व मिळविले. येथे उद्धव ठाकरे यांना कधी लक्ष्य घालण्याची वेळच आली नाही.

कोणतीही निवडणूक असो शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सढळ हस्ते मदत करीत खंबीरपणे साथ दिली. कार्यकर्त्यांचे जाळे टिकवत यश खेचत आणले. पालघरचा खासदारही आज महायुतीचा आहे. ठाणे, मुंबईत दोन खासदारही निवडून आणले. कोकणात राणेंच्या विजयातही शिंदेशाहीचा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही. कोकण हा नेहमीच बाळासाहेबांच्या मागे राहिला. आज कोकणातील नेतेही शिंदेच्या मागे राहिले.

CM Eknath Shinde
BJP Assembly Candidates : भाजपच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होऊ शकते 50 उमेदवारांची घोषणा ?

क्षमता सिद्ध...

काहीसे सौम्य स्वभावाचे शिंदे पक्षासाठी अधिक वेळ देतात. जर शिंदे उद्धव ठाकरेंच्या मागे राहिले असते तर त्यांना नेतृत्व करण्याची संधी कधीच मिळाली नसती. ठाकरेंपासून दूर जाताना स्वत:ची क्षमताही त्यांनी सिद्ध करून दाखविली आहे. शाखाप्रमुख, नगरसेवक, मंत्री, पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला असला तरी आज ते शिवसेनेचे प्रमुखही आहेत. हे सर्व खरे असले तरी भविष्यात ते मुख्यमंत्री असतील याची शाश्वती नाही.

जोपर्यंत भाजपचा त्यांना पाठिंबा आहे. तोपर्यंत चिंता नाही. पण, शेवटी पक्ष चालविणे, तो टिकविणे, पक्षाची ध्येयधोरणे जनतेच्या मना रूजविणे सोपे नसते. उद्या समजा राज्यातील सत्ता गेली तर पक्षाची कामगिरी कशी असेल? आज जे नेते, मंत्री त्यांची आरती ओवाळतात ते असतील का? शिंदे यांचे राजकीय वारसदार कोण? तसे नावही पुढे येत नाही.

आज शिंदे यांचा पक्षही एकखांबी आहे. बाळासाहेबांचा किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष कोणावर अवलंबून नव्हता, नाही. ते भाजपसारख्या पक्षालाही किंमत देत नव्हते. शिंदेंचे तसे नाही. हा पक्ष आजतरी भाजपवर अवलंबून असल्याचे दिसते. भाजपची साथ सोडून शिंदे स्वबळावर लढू शकतात. सत्ता खेचून आणण्याची धमक त्यांच्यात आहे का? हाही प्रश्‍न आहे.

CM Eknath Shinde
Eknath Shinde News : ना देवा 'भाऊ', ना अजित 'दादा'; महायुतीत शिंदेच एक(टा)नाथ!

एकीकडे पक्षावर भक्कम पकड निर्माण करताना प्रशासनावरही वचक शिंदे यांनी निर्माण केला आहे. जागेवर निर्णय घेणे. न्याय देणे. कोणतेही काम रेंगाळत ठेवायचे नाही आणि थेट लोकांशी संपर्क ठेवण्याचा ते प्रयत्न करतात.

ठाकरे यांच्या शिवसेनेला चितपट करण्यसाठी ते नेहमीच सज्ज असतात. आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या पक्षाला किती जागा मिळतील हे सांगता येत नाही. पण, त्यांच्या पक्षाला सहानुभूती मिळताना दिसते आहे. गेल्या दोन वर्षात शिंदेच्या शिवसेनेत नाराजी आहे. कोणी फुटला आहे. तो पुन्हा ठाकरेंकडे गेला असे चित्र पाहण्यास मिळाले नाही. याचा अर्थच असा होतो की पक्षातील जुन्या आणि नव्या नेत्यांना सांभाळताना तारेवरची कसरतही ते करताना दिसतात. ते एकएक पाऊल असे टाकतात की महायुतीतही त्यांना कोणी आव्हान देण्याच्या भानगडीत पडत नाही. हे चित्र कायम असेच असेल का ? याचे उत्तर मात्र काळच देईल.

* लोकसभा निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदेंचा आत्मविश्वास वाढला

*  जुन्या आणि नव्या नेत्यांना सांभाळण्याची तारेवरची कसरत यशस्वी

* शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आव्हान देण्याची क्षमता

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - ९८८१५९८८१५

CM Eknath Shinde
Mahayuti News : भाजपचा 160 जागांवर दावा; महायुतीमध्ये जागावाटपावरून पेच

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com