Ujjani Dam : आगामी काळात पाणीटंचाईचे सावट मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थतीचा मुकाबला करताना प्रशासनला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बेंद ओढ्याला उजनी धरणातून सीना माढा जोड कालवाच्या बोगद्यातून अथवा कॅनॉलच्या माध्यमातून पाणी सोडावे, यासाठी पाणी नाही तर.. मतदान नाही, असा आक्रमक पवित्रा बेंद ओढा पाणी संघर्ष समितीने घेतला असल्याने येत्या काळात उजनी धरणाचे पाणी पेटण्याची शक्यता आहे.
माढा व करमाळा विधानसभेत समाविष्ट असलेल्या पिंपरी, ढवळस, पिंपळखुटे, अंबाड, कुर्डू, भोसरे, भोगेवाडी, झाखले, जाधववाडी, रणदिवेवाडी, वडाचीवाडी, तडवळे, उंदरगाव, महातपुर अशा १३ गावांमधून ३२ किलोमीटर जात असलेल्या बेंद ओढ्याला उजनी धरणातून सीना माढा जोड कालवाच्या बोगद्यातून अथवा कॅनॉलच्या माध्यमातून पाणी सोडावे. ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने समोर येत आहे. आगामी काळात बेंद ओढ्याला पाणी नाही आलं तर ... आगामी विधानसभा आणि लोकसभा मतदानावर 13 गावे बहिष्कार घालणार आहेत. पाणी नाही तर.. मतदान नाही, असा आक्रमक पवित्रा बेंद ओढा पाणी संघर्ष समितीने घेतला आहे.
32 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेंद ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण धनराज शिंदे यांनी माढा वेल्फेअर फाउंडेशन व नाम फाऊडेंशनच्या माध्यमातून तीन वर्षापूर्वीच पूर्ण केले. एकूण 13 गावातून हा बेंद ओढा जात आहे. या माध्यमातून 35 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. आगामी काळात जर बेंद ओढ्याला पाणी सोडण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका नाही घेतली तर ... राज्य सरकारच्या विरोधात येणाऱ्या सहा डिसेंबर रोजी अधिवेशनामध्ये नागपूरला उपोषण करण्याचा इशाराही या वेळी बेंद ओढा पाणी संघर्ष समितीचे अण्णा ढाणे व बाबाराजे जगताप यांनी दिलेला आहे.
13 गावांची तहान भागवल्याशिवाय शांत बसणार नाही
23 नोव्हेंबर रोजी टेभुर्णी लातूर राष्ट्रीय महामार्ग कुर्डू येथे रोखणार असून, जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत दाढी काढणार नाही. आता उजनीचे पाणी 32 किलोमीटरच्या बेंद ओढ्यात आणून 13 गावांची तहान भागवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा कुर्डू ग्रामपंचायतीचे सरपंच बाबाराजे जगताप यांनी दिला आहे.
(Edited by Sachin Waghmare)