Solapur, 22 September : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या इशाऱ्याला मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. पक्षशिस्त मोडून मोहोळ राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार राजन पाटील यांना कोणी दिला.
तसेच, राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना घेऊन अजितदादांनी दिलेल्या निधीतून झालेल्या विकासकामांची उदघाटने कसे करतात, असा सवाल करत अगोदर या दोघांवर कारवाई करा. मगच त्यांच्यावर मी काही बोललो असेल तर माझ्यावरही कारवाई करावी, असे प्रतिआव्हान उमेश पाटील यांनी तटकरेंना दिले.
मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना जागा दाखवून दिली जाईल, असा इशारा उमेश पाटील यांचे नाव न घेता दिला होता. त्यावर पाटील यांनी खुलासा केला आहे.
उमेश पाटील (Umesh Patil) म्हणाले, पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निश्चित अधिकार आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडे माझी मागणी आहे की, कारवाई सिलेक्टिव्ह नसावी. आपल्या अधिकारात हस्तक्षेप करून राजन पाटील यांनी मोहोळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर कसा केला?
राजन पाटील यांना हा अधिकार कोठून दिला गेला? कोणी दिला?पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली होती का? उमेदवारीसाठी अर्ज मागवले गेले आहेत का? असे झालेले नसताना राजन पाटील पक्षाची शिस्त न पाळता परस्पर उमेदवारी जाहीर करत असतील तर पहिली कारवाई ही राजन पाटील यांच्यावर झाली पाहिजे.
यशवंत माने हे घड्याळाचे आमदार आहेत. पण ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना घेऊन अजितदादांनी दिलेल्या निधीतून झालेल्या विकास कामांचे उदघाटन का करत आहेत? यासंदर्भात प्रांताध्यक्षांनी भूमिका मांडायला पाहिजे होती. राष्ट्रवादीचा प्रवक्ता, माजी जिल्हा परिषद सदस्य उपलब्ध आहे. राजन पाटील घड्याळाचे आहेत. मग आम्हालाही उदघाटनाला बोलावायला पाहिजे होते, असे उमेश पाटील यांनी नमूद केले.
तुम्ही उत्तर सोलापूर आणि मोहोळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना उदघाटनाला बोलावता. मग पक्षविरोधी करावाई कोण करतंय. त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्यावर कारवाई करावी. मग त्यांच्यावर काही बोललो असेल तर माझ्यावरही कारवाई करावी, असे आव्हान उमेश पाटील यांनी दिले.
अजित पवारांच्या टीकेवर स्पष्टीकरण
अजित पवारांचा यापूर्वीचा दौरा माझ्यामुळे रद्द झाला आहे, असे मी कधी म्हणालो आहे का? असं मी म्हटल्याचा पुरावा दिला तर मी राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन. असं मी कुठंही म्हटलंलं नाही. उलट ह्यांनीच अजित पवारांच्या कानात भरलं की, मी असं उठवलं की अजितदादांचा मागचा दौरा मी रद्द करायला लावला.
पण अजित पवारांना त्यांच्यापेक्षा मी चांगला ओळखतो. ते एकदा ठरवलं की परिणामाची चिंता न करता ते करतात. त्यांचा दौरा कुठल्यातरी कारणाने रद्द झाला असेल. माझ्या सांगण्यावरून अजितदादांचा दौरा रद्द झाला, असं मी कधीही म्हटलेलं नाही. त्यांचा तसा गैरसमज करून दिल्यामुळे ते तसं बोलले असतील. त्याबाबत मला काहीही बोलायचं नाही, असे स्पष्टीकरणही उमेश पाटील यांनी दिले.
सत्ता नसती तर राजन पाटील अजितदादांसोबत आले असते का?
सत्ता नसती तर माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने हे अजितदादांसोबत आले नसते. पण, सत्ता नसतानाही हा उमेश पाटील अजित पवारांसोबत असता. ही वस्तुस्थिती अजितदादांनाही माहिती आहे.
बऱ्या वाईट काळात साथ देणारा माझ्यासारखा कार्यकर्ता स्थानिक कारणामुळे विरोध व्यक्त करतो आहे. पक्षात लोकशाही असं मी मानतो आणि माझी भूमिका राजन पाटील यांच्यासारख्या दडपशाहीखोर व्यक्तीच्या विरोधात आहे. सत्तेसाठी ते पक्षात आले आहेत, अशी आजही माझी ठाम धारणा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.