Umesh Patil-Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Umesh Patil : राजन पाटलांशी उभा दावा मांडणारे उमेश पाटलांचा राजीनामा अखेर मंजूर; लवकरच तुतारी फुंकणार

Ajit Pawar NCP News: उमेश पाटील यांनी दिलेला राजीनामा अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंजूर करण्यात आला आहे. पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी राजीनामा मंजूर झाल्याचे पत्र उमेश पाटील यांना पाठविले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 25 October : मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्याशी उभा दावा मांडून उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदाचा दिलेला राजीनामा पक्षाकडून मंजूर करण्यात आला आहे, त्यामुळे उमेश पाटील यांच्या हाती लवकरच तुतारी दिसणार आहे. मात्र, राजीनाम्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी आपल्या मनात कोणतीही कटुता नाही, असे पाटील यांनी राजीनामा मंजूर झाल्यानंतर सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा मोहोळमध्ये आली होती. या यात्रेच्या कार्यक्रमात आमदार यशवंत माने यांनी अजित पवारांपुढेच उमेश पाटील (Umesh Patil) यांची तक्रार केली होती. त्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही उपस्थित होते. तटकरे यांनी सभेत बोलताना उमेश पाटील यांना कडक शब्दांत इशारा दिला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिस्त मोडणाऱ्या व्यक्तीला जागा दाखविण्यात येईल, असे खडे बोल सुनावण्यात आले होते. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत केलेली टीका मात्र उमेश पाटील यांच्या मनाला लागली होती. त्यातूनच त्यांनी महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता.

उमेश पाटील यांनी दिलेला राजीनामा अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंजूर करण्यात आला आहे. पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी राजीनामा मंजूर झाल्याचे पत्र उमेश पाटील यांना पाठविले आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उमेश पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे, त्यामुळे उमेश पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र, त्यांच्या राजीनामा मंजूर होत नसल्याने उमेश पाटील यांचा पक्षप्रवेश रखडला होता.

उमेश पाटील-राजन पाटील काय होता संघर्ष?

मोहोळच्या राजकारणात उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकत्र होते. मात्र, त्यांच्यातील सन्मानाच्या मुद्यावरून पडलेली दरी वाढत गेली. दोन्ही पाटील यांच्यात टोकाचा संघर्ष होता, तरीही ते एकाच पक्षात होते.

अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून उमेश पाटील यांनी बोचरी टीका राजन पाटील, आमदार यशवंत माने यांच्यावर केली होती. त्यातून वाद वाढत गेला आणि त्याची तक्रार आमदार माने यांनी अजित पवारांकडे केली. अजित पवार यांनी केलेल्या टीकेमुळे दुखावलेल्या उमेश पाटील यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

रोहित पवारांच्या विरोधाचे काय?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उमेश पाटील यांच्या प्रवेशाला विरोध असल्याचे सांगितले होते, त्यामुळे उमेश पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश आणि पुढील राजकीय इनिंग कशी असणार, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT