Solapur News : काँग्रेस पक्षाची बहुचर्चित विधानसभा उमेदवाराची पहिली यादी जाहीर झाली असून या यादीत 48 जणांना संधी देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातून एकमेव अक्कलकोट मतदारसंघातून माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddhram Mhetre) यांना पहिल्याच यादीत उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाने वादात असणाऱ्या जागांची घोषणा करण्याचे टाळून वाद आणखी वाढणार नाही, याची काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या यादीही जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर सर्वांचेच लक्ष काँग्रेसकडे लागलेले होते.आता काँग्रेसचीही 48 उमेदवारांची जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी सिद्धाराम म्हेत्रे यांचा प्रमुख दावा होता. जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या रुपाने म्हेत्रे यांना प्रथमच उमेदवारीसाठी स्पर्धा होती.
मात्र, काँग्रेस (Congress) हायकमांड, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीत अक्कलकोटमधून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना लीड मिळाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी म्हेत्रे यांनी पुन्हा कंबर कसली आहे.
सोलापूर जिल्ह्यात मागील निवडणुकीत आघाडीत दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, या दोन्ही मतदारसंघावर मित्र पक्षांकडून दावा सांगण्यात येत आहे, त्यामुळे या दोन्ही जागेवरचे उमेदवार जाहीर करण्याचे काँग्रेस पक्षाकडून टाळण्यात आले आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेत वाद आहे, तो वाद आणखी वाढू नये, याची खबरदारी काँग्रेसने सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करताना घेतल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच मागील निवडणुकीत लढवलेल्या या दोन्ही जागांचे उमेदवार काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले नाहीत. महाविकास आघाडीतील जागावाटपाचे कोडे अजूनही सुटले नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही सोलापूर जिल्ह्यातील दोन जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. काँग्रेसनेही कोणताही वाद नसलेल्या अक्कलकोट मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोणते मतदारसंघ कोणाला मिळणार, याची प्रचंड उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.