Solapur, 08 December : मारकडवाडीच्या जनतेचा लढा माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी हातात घेतल्याने त्यांचे कौतुक आहे. फक्त माझ्या परवानगीशिवाय आमदारकीचा राजीनामा देऊ नका. राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक झाली तरी तुम्हीच निवडून येणार आहात, याबाबत माझ्या मनात शंका नाही. पण, माळशिरसमध्ये बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत, असे सरकारने सांगितले, तरच आपण राजीनामा देऊ, अशी ताकीद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार उत्तम जानकर यांना दिली.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज (ता. 08 डिसेंबर) मारकडवाडीच्या ग्रामस्थांना भेटण्यासाठी आले होते. त्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) बोलत होते. कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, विद्या चव्हाण, सचिन खरात हे उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, अनेक मोठे नेते येऊन तुमच्याशी संवाद साधतील. पण, तुम्ही जो ठामपणा दाखवला आहे. तुमची मतं मांडायला तुम्ही या ठिकाणी आला आहात. जेवढी मतं उत्तम जानकर यांना मिळाली आहेत, त्यापेक्षा जास्त लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी हा लढा हातात घेतल्याने त्यांचे कौतुक आहे.
निवडून आलेले सरकारच्या बाजूचे काही आमदार खासगी सांगतात की, निवडून आलो ठीक आहे. पण, एवढी मतं कशी काय पडली आहेत, सरकारच्या बाजूच्या आमदारांनाच असे आर्श्चय वाटतंय. त्यामुळे कोणाचा प्रभाव आहे, हे एकदा कळलं पाहिजे. सत्तेत बसलेल्या माणसालाही जनता आपल्या मागे आहे, असा विश्वास असायला हवा, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील म्हणाले, सत्तेत बसलेल्या माणसाला आमदारकीची शपथ घेताना वाटत असेल की गडबड करूनच निवडून आलो आहे, तर तो काम करू शकणार नाही. त्या आमदाराला मोकळेपणाने काम करायचं असेल तर त्याला कळलं पाहिजे की आपण खरंच एवढ्या मतांनी निवडून आलाे आहे. पण खरंच निवडून आलोय असं म्हणायचं असेल तर कागदावरची मतं मोजायला पाहिजे.
मारकडवाडीचं मतदान थांबवायला जेवढे पोलिस सरकारने पाठवले, तेवढ्या लोकांमध्ये मतदान मोजून होतं. त्यामुळे तुमच्याकडं माणसं जर एवढी असतील तर कशाला मशीनच्या नादाला लागताय. सरकार आणि निवडणूक आयोगाला आमचं चॅलेंज आहे की, उद्यापासूनच ईव्हीएम मशीन बंद करा. कारण, जनतेच्याच मनात शंका आहे. आमचं सोडून द्या. आम्ही राजकीय पक्ष आहोत. पण ज्यांनी मतदान केलं, त्या मतदारांचीच ईव्हीएमवर शंका असेल तर जनतेचा मतदानाचा हक्क टिकविण्यासाठी ईव्हीएमऐवजी पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.